रशियाचे सतत ७० हून अधिक दिवसांपासून युक्रेनवर हल्ले सुरु आहेत. शहरेच्या शहरे बेचिराख होऊ लागली आहेत. युक्रेन सोडून गेलेले नागरीक जेव्हा आपल्या घराकडे परततील तेव्हा त्यांना भग्नावशेषाशिवाय काहीच पहायला मिळणार नाही याची सोय रशियाने केली आहे. युद्ध आणखी किती दिवस, महिने चालेल कोणालाच कल्पना नाही. परंतू, युद्धाची जखम कित्येत वर्षे तशीच ओली राहणार आहे. जमिनीत गाडली गेलेली जिवंत शस्त्रास्त्रे नष्ट करण्यात कित्येक वर्षे लागणार आहेत. अशा या साऱ्या परिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अद्याप हार मानलेली नाही.
झेलेंस्की यांच्या भाषणाने यंदाच्या ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली. भविष्यात चित्रपट निर्मात्यांनी फॅसिझमवरील व्यंगचित्र सादर करावेत. त्यांनी गप्प राहू नये, असे आवाहन करताना झेलेन्स्की यांनी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन यांनी हिटलरवर केलेल्या वक्तव्याची री ओढली.
1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला चॅप्लिननी शेवटचे भाषण दिले होते. यामध्ये "लोकांचा द्वेष संपेल आणि हुकूमशहा मरतील आणि त्यांनी लोकांकडून घेतलेली सत्ता लोकांकडे परत येईल.", असे म्हटले होते. झेलेन्स्की यांनी याची आठवण करून दिली. आम्हाला नव्या चॅप्लिनची गरज आहे. जो सांगेल की येत्या काळात आम्ही शांत बसणारे नाही, असे झेलेन्स्की म्हणाले.
फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या "अपोकॅलिप्स नाऊ" आणि चार्ली चॅप्लिनच्या "द ग्रेट डिक्टेटर" सारख्या चित्रपटांसारखे झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील सद्य परिस्थितीचे वर्णन केल्याचे एबीसी न्यूजने म्हटले आहे. "द आर्टिस्ट" चित्रपट निर्माते हझानाविसियसच्या नवीन चित्रपटाचे "फायनल कट" चे नाव बदलून "Z" असे करण्यात आले. हा फिल्म फेस्टिव्हल २८ मे पर्यंत चालणार आहे.