मुंबई, दि. 27- सोशल मीडियाचा सगळीकडेच भरमसाठ वापर केला जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाताना तेथिल अपडेट्स सगळेच जण सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. इतकंच नाही, तर फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किग साइटवर लाइव्ह करण्याचीही नवी पद्धत सुरू झाली आहे. फेसबुकवर लाइव्ह करणं युजर्सच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना आपण याआधीही पाहिल्या आहेत. असाच एक प्रकार कॉलिफोर्नियामध्ये घडला आहे. एक १८ वर्षांची मुलगी आपली बहिण आणि इतर मैत्रिणींसोबात गाडीने चालली होती. ती स्वत: गाडी चालवत होती.गाडी चालवताना ती मुलीने इन्स्टाग्राम लाइव्ह करायला सुरूवात केली. ते करत असतान तिचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीचा अपघात झाला. अब्दुलिया सँचेज असं गाडी चालवणाऱ्या मुलीचं नाव आहे. या दुर्घटनेत अब्दुलियाच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला आहे. जॅकलीन असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. गाडीमध्ये अब्दुलिया आणि जॅकलीन या दोघी बहीणी आणि त्यांच्या मैत्रीणी होत्या अब्दुलिया गाडी चालवत होती तर जॅकलीन मागे बसली होती. तिने सीट बेल्टही लावला नव्हता. यामधील सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे अपघात झाल्यानंतरही अब्दुलियाने इन्स्टाग्राम लाइव्ह सुरूच ठेवलं होतं. तसंच अपघातात आपली बहीण जखमी झाल्याचं ती लाइव्हमध्ये सांगत होती. बहीणी हॉस्पिटलमध्ये नेण्याची तत्परता न दाखवता तीला झालेली दुखापत ती लाइव्ह व्हिडीओत सांगत होती.
गाडी चालवताना अब्दुलियाने वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर बसविले होते. गाडी वेगात होती. त्यातल्या एकानेही सीटबेल्ट लावला नव्हता. एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने लाइव्ह करत होती. तसंच ती गाणीही गुणगुणत होती वेग अधिक असल्याने गाडीचा अपघात झाला आणि गाडी हवेत उडून रस्त्याच्या कडेला आदळली.. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गुन्ह्यासाठी तिला शिक्षाही होऊ शकते.
अब्दुलियावर गाडी चालवण्याच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कारमध्ये असलेल्या अब्दुलियाच्या इतर मैत्रीणींनाही दुखापत झाली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. हा अपघात नक्की इन्स्टाग्राम लाइव्हमुळे झाला की इतर कोणत्या गोष्टीमुळे याचा तपास केला जातो आहे.