वॉशिंग्टन - अमेरिकत वास्तव्य कायम ठेवण्यासाठी एका बनावट विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १२९ भारतीयांसह सर्व १३० विदेशी विद्यार्थ्यांना याची जाणीव होती की, ते अवैधपणे राहण्यासाठी गुन्हा करीत आहेत, असे मत अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने व्यक्त केले आहे.अमेरिकी अधिकाऱ्यांनी या १३० विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ‘पे अँड स्टे’ टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रेटर डेट्रॉइर्ट भागात डीएचएसच्या तपास शाखेने बनावट विद्यापीठ ‘युनिव्हर्सिटी आॅफ फर्मिंगटन’ स्थापन केली होती.विदेश मंत्रालयाने सांगितले की, युनिव्हर्सिटी आॅफ फर्मिंगटनमध्ये प्रवेश घेणाºया सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत होते की, यात ना शिक्षक आहेत ना शिक्षण आहे. त्यांना हेही माहीत होते की, अमेरिकेत अवैधपणे वास्तव्य करण्यासाठी ते गुन्हा करीत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत संपर्कासाठी भारताने विनंती केली आहे.‘पे अँड स्टे’ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८ भारतीयांना मिशिगनच्या एका न्यायालयात हजर करण्यात आले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले त्यात फनीदीप करनाती, भरत काकीरेड्डी, सुरेश कंडाला, प्रेम रामपिसा, संतोष समा, अविनाश थक्कलपल्ली, अश्वन्थ नुने आणि नवीन प्रथिपती यांचा समावेश आहे. करनाती यांचे वकील जॉन डब्ल्यू ब्रूस्टार यांनी सांगितले की, या सर्वांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगितले आहे. त्यांनी असाही आरोप केला की, अशा प्रकारचे अभियान चालवून मुलांना फसविण्यात येत आहे. हा सर्व कट आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकेतील ‘पे अँड स्टे’ प्रकरण : ‘त्या’ विद्यार्थ्यांना गुन्हा करीत असल्याची कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 5:24 AM