बगदाद - मध्यपूर्ण आशियामधील इराकमध्ये सध्या एका रहस्यमय आजाराची साथ वेगाने पसरत आहे. यामध्ये रुग्णाला तीव्र ताप येतो. त्यानंतर नाकातून रक्तस्राव होतो. या आजारामुळे रुग्णाच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार इराकमध्ये या आजारामुळे आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार हा एक विषाणूजन्य आजार आहे. त्यावर अद्यापतरी कुठलीही लस उपलब्ध झालेली नाही. न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार गाईवर कीटकनाशकांचा फवारा करताना एक आरोग्य कर्मचारी या विषाणूच्या संसर्गाची शिकार झाला होता. हा आजार पसरल्यानंतर इराकमधील ग्रामीण परिसरांमध्ये आरोग्य कर्मचारी पीपीई किट वापरून काम करत आहेत. या रक्तस्त्रावी आजाराला Crimean-Congo Haemorrhagic Fever (CCHF) असं नाव देण्यात आलं आहे. हा आजार प्राण्यांमधून माणसांमध्ये वेगाने पसरत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांमध्ये हा आजार कीटक चावल्यामुळे पसरत आहे. तर संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्याने माणसांनाही हा आजार होत आहे. इराकमध्ये माणसांमध्ये सीसीएचएफच्या संसर्गाचे आतापर्यंत १११ रुग्ण सापडले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, वेगाने पसरू शकतो. कारण व्यक्तीच्या शरीरामध्ये आत आणि बाहेर अशा दोन्हीकडे रक्तस्त्राव होतो. सर्वात गंभीर बाब म्हणजे नाकामधून रक्त वाहणे ही आहे. सीसीएचएफच्या पाच रुग्णांपैकी दोघांच्या मृत्यूचे कारण हे नाकातून रक्त वाहणे हे आहे.
वैद्यकीय अधिकारी हैदर हंतोचे यांनी सांगितले की, सीसीएचएफच्या रुग्णांची संख्या धक्कादायक आहे. या संसर्गजन्य आजाराच्या अर्ध्याहून अधिक रुग्णांची नोंद ही दक्षिण इराकमध्ये झाली आहे. हा कृषीबहूल भाग आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये या आजाराच्या रुग्णांना बोटावर मोजता येत होते. मात्र आता हा आजार वेगाने पसरत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार धी कार प्रांतामध्ये हा संसर्ग जंगली पाळीव पशू म्हैशी, गाय, बकरी आणि मेंढ्यांमधून पसरत आहे.