डोनेटक्स : पूर्व युक्रेनमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतर लगेचच बंडखोरांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण ठार झाले. मात्र, संघर्षमय भागात बहुतेक ठिकाणी संघर्ष थांबला आहे.स्थानिक वेळेनुसार रविवारी मध्यरात्री युद्धबंदी लागू झाल्यानंतर अवघ्या २० मिनिटांनी लुगांक्स प्रांतातील पोपासना गावात ग्रॅड क्षेपणास्त्राने हल्ला झाला. त्यात ज्येष्ठ नागरिक व महिला ठार झाली, असे स्थानिक प्रशासक गेन्नाडिली मोस्कल यांनी सांगितले. रशियावादी बंडखोर आणि युक्रेन यांच्यात गेल्या गुरुवारी युद्धबंदी समझोता झाला. त्यासाठी युक्रेन, रशिया, जर्मनी व फ्रान्सने खूप प्रयत्न केले. पूर्व युक्रेनच्या अन्य प्रांतांत आमच्या सैन्यांवर १० वेळा गोळीबार झाला, असे लष्कराने सांगितले. युद्धबंदी व्हायच्या काही तास आधी डिबाल्टसिव्ह गावात युक्रेनच्या सैन्याला रशियावादी बंडखोरांनी पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षी एप्रिलपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत ५,४८० लोक ठार झाले असून, आताच्या ताज्या युद्धबंदीमुळे हे युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे; परंतु यापूर्वी झालेले युद्धबंदी कुचकामी ठरली होती. (वृत्तसंस्था)