प्रसिद्ध बॉडीबिल्डर सेड्रिक मॅकमिलन (Cedric McMillan) यांचे वयाच्या 44 व्या वर्षी निधन झाले आहे. रिपोर्टनुसार, ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मॅकमिलन हे आधीच हृदयासंबंधी आणि लाँग कोविड (Long Covid) समस्यांशी झुंज देत होते. मॅकमिलन यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या एका स्पॉन्सरने दिली. दरम्यान, अमेरिकेत राहणारे सेड्रिक मॅकमिलन हे एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर तसेच यूएस आर्मीचे इंस्ट्रक्टर (US Army Instructor) सुद्धा होते.
2017 मध्ये अरनॉल्ड क्लासिक बॉडीबिल्डिंगचे टायटल (Arnold Classic Bodybuilding Title) जिंकून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली होती. Generation Iron च्या रिपोर्टनुसार, बॉडीबिल्डर मॅकमिलन यांना ट्रेडमिलवर धावत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मॅकमिलन यांना कोविडचा (COVID-19) बराच काळ त्रास होत असल्याचे सांगण्यात आले होते. 2020 मध्ये बरे झाल्यानंतरही लाँग कोविडशी संबंधित समस्यांना तोंड देत होते. याशिवाय, त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता. त्यांना एक-दोनदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते.
28 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅकमिलन यांनी आपल्या शरीराशी संबंधित काही समस्या स्पष्ट केल्या. ते म्हणाले होते की, 'मी काही कारणास्तव पोटात अन्न ठेवू शकत नाही. मी जेंव्हा काही खातो किंवा पितो तेंव्हा उचक्या यायला लागतात. पोटात काहीही थांबू शकत नाही.' मॅकमिलन यांना स्पॉन्सर करणाऱ्या एक कंपनीने (Black Skull USA) बुधवारी इन्स्टाग्रामवर त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. 'तुम्हाला कळवण्यास आम्हाला खेद वाटतो की आमचा मित्र आणि भाऊ सेड्रिक मॅकमिलन यांचे आज निधन झाले. अॅथलीट, मित्र आणि वडील म्हणून सेड्रिकची खूप आठवण येईल', असे कंपनीने म्हटले आहे.