सिंगापूर : भारताप्रमाणेच सिंगापूरच्या सुरुवातीच्या काळात पारसी समुदायाचे योगदान मोठे आहे. उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील या समाजाच्या योगदानाचा उत्सव सिंंगापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा समुदाय प्रथम भारतात आला होता. त्यानंतर ते १८०० च्या दशकात दक्षिणपूर्व आशियात गेले. ‘द पारसीज आॅफ सिंगापूर : हिस्ट्री, कल्चर, कूझिन’या पुस्तकाचे प्रकाशन यानिमित्ताने करण्यात आले. या समुदायाची माहिती आणि प्रवास या पुस्तकात आहे. या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मंत्री गे्रस फू यांनी केले. पारसी समुदाय सिंगापूर आणि सुमात्रा बेटावर (इंडोनेशिया) १८०० च्या दशकात आला होता. त्यांनी येथे १९०० च्या दशकात सोडा वॉटर आणि बर्फाचे कारखाने सुुरु केले होते. परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे नवरोजी आर. मिस्त्री आणि पत्रकार व लेखिका सुना कांगा यांच्या कार्याविषयी यात माहिती देण्यात आली आहे. २६५ पृष्ठांचे हे पुस्तक लेखिका सुबीना अरोरा खनेजा यांनी संकलित केले आहे. सिंगापूरमधील पारसी समुदायातील ३५० लोकांना ते भेट देण्यात आले आहे. जगभरातील पारशांची संख्या एक लाखांच्या घरात असून, त्यापैकी ५0 ते ६0 हजार पारशी लोक एकट्या भारतामध्ये आहेत.
सिंंगापूरमध्ये पारशी समाजाच्या योगदानाचा उत्सव
By admin | Published: April 21, 2017 2:13 AM