नवी दिल्ली:अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख नागरिकांना भारतात येण्यासाठी भारत सरकार मदत करणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, अफगाणिस्तानात मागील काही दिवसांपासून परिस्थिती बिघडली आहे. भारत सरकार अफगाणिस्तानातील घटनाक्रमावर लक्ष्य ठेवून आहे. आम्ही तेथे अडकलेल्या नागरिकांसाठी सतत अॅडव्हायजरी जारी करत आहोत.
न्यूज एजंसी भाषाच्या रिपोर्टनुसार, परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षा लेखी यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर बोलताना सोमवारी म्हटलं की, आम्ही अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख प्रमुखांच्या संपर्कात आहोत. ज्यांना भारतात येण्याची इच्छा असेल, त्यांना भारत सरकार पूर्ण मदत करेल. सध्या अफगाणिस्तानातील परिस्थितीवर बारीक लक्ष दिले जात आहे. भारत सरकार अफगाणिस्तानातील भारतीय नागरिकांच्या हितांच्या रक्षणासाठी कठोर पाऊले उचलले, अशी माहितीही त्यांनी दिली.
तालिबानींच्या दहशतीने अफगाणिस्तानात हाहाकार
अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारीच देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. राष्ट्रपती निवासानंतर घनी यांचे कार्यालयही तालिबानी नेत्यांनी सोमवारी ताब्यात घेतले आणि तिथे आपला झेंडा लावला. 90 टक्के अफगाण तालिबानींनी ताब्यात घेतला आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. त्या नागरिकांना मृत्यूपेक्षाही तालिबानचीच अधिक भीती वाटत आहे.