वॉशिंग्टन - कॅनडाच्या सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या संस्थापकाचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 190 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1300 कोटींची क्रिप्टोकरन्सी लॉक झाली आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीलाही याचा पासवर्ड माहीत नाही. तसेच मोठमोठे सेक्युरिटी एक्सपर्ट्सही आतापर्यंत ही करन्सी अनलॉक करू शकलेले नाहीत.
गेराल्ड कॉटन असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय व्यक्तीचं नाव असून त्यांनी क्वॉड्रिगासीएक्स या कंपनीची स्थापना केली. बिटकॉइनच्या बदल्यात प्रत्यक्षात पैसे पुरवण्याचं काम क्वॉड्रिगासीएक्स करत असे. गेराल्ड हे गेल्या वर्षी भारतात आले होते. भारतातील अनाथ मुलांसाठी गेराल्ड यांना एक अनाथाश्रम सुरू करायचा होता. त्या निमित्ताने ते भारतात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना पोटाचा एक आजार झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. बिटकॉइन स्वीकारून प्रत्यक्ष पैसे देण्याचं काम कॉटन करत असत. इतर कुणालाही ते काम कसं करतात किंवा त्यांच्या लॅपटॉपचा पासवर्ड काय आहे हे माहीत नाही.
गेराल्डच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी जेनिफरने रॉबर्टसन आणि त्यांच्या कंपनीने कॅनडा कोर्टात क्रेडिट प्रोटेक्शनबाबत याचिका दाखल केली आहे. यामध्ये गेराल्ड यांनी जिवंत असताना कधीच पासवर्ड सांगितला नसल्याचं म्हटलं आहे. तसेच गेराल्ड यांची संपत्ती असलेले इनक्रिप्टेड अकाउंट अनलॉक करू शकलेले नाहीत. त्यामुळे यामध्ये जवळपास 190 मिलियन डॉलरची क्रिप्टोकरन्सी लॉक असल्याचं म्हटलं आहे. तसेच आम्ही क्रिप्टोकरन्सीचा शोध घेणे आणि ते सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हाला आमच्या ग्राहकांना त्यांच्या डिपॉझिटचे पैसे द्यायचे आहेत, मात्र अकाउंट उघडू शकत नसल्याने आम्ही त्यांना त्यांचे पैसे देण्यास असमर्थ आहोत, अशी माहिती याचिकेत देण्यात आली आहे.