ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १२ - फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने जगभरातील मुस्लिमांना पाठिंबा दर्शवत फेसबूक मुस्लिमांच्या हक्कासाठी लढा देईल असे सांगितलेले असतानाच गूगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई हेही मुस्लिमांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भय किंवा दहशतीमुळे आपल्या मूल्यांचा पराभव होता कामा नये. मुक्त विचारसरणी, सहिष्णुता व नव्या अमेरिकी नागरिकांचा स्वीकार हे देशाचे सामर्थ्य आहे, असे मत एका खुल्या पत्रातून मांडताना त्यांनी मुस्लिमांना पाठिंबा दर्शवला.
मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश बंदी करावी, असे विधान अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कॅलिफोर्निया हत्याकांडानंतर बोलताना त्यांनी हे विधान केले. आमच्या देशाच्या प्रतिनिधींनी नेमके काय सुरू आहे याचा शोध घेईपर्यंत तरी मुस्लिमांना देशात प्रवेशास पूर्णपणे बंदी घालावी, असे ट्रम्प यांच्या प्रचार कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त होऊ लागला. फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यानेही ट्रम्प यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत फेसबूक मुस्लिमांच्या हक्कासाठी लढा देत राहील, असे म्हटले होते. फेसबूकचा सर्वेसर्वा या नात्याने आपण सर्व मुस्लिमांच्या हक्कासाठी लढत राहू तसेच मुस्लिमांसाठी सुरक्षित व शांतीचं वातावरण तयार व्हावं यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे मार्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
मार्क झुकेरबर्गप्रमाणेच गूगलचे सीईओ पिचाई यांनीही ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्या वक्तव्यावर नाराजी नोंदवली. एखाद्या विशिष्ट धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करणं, त्यांचा आवाज, विचार व योगदान यांच्याशिवायही आपला देश चांगला बनू शकतो, असं म्हणणं हे अतिशय दुर्दैवी आहे, असे मत पिचाई यांनी मांडले.