ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 7 - आयफोनची विक्री मंदावल्यामुळे अॅपलच्या उत्पन्नात घट झाल्याने अॅपल कंपनीने थेट सीईओ टिम कूकनाच दंड ठोठावला. दंड म्हणून कूक यांच्या वेतनात 15 टक्के कपात करण्यात आली आहे. नफ्यात घट झाल्याने अॅपलने सीईओ कुक आणि कंपनीच्या अन्य वरिष्ठ अधिका-यांच्या वेतनात कपात केली आहे.
अॅपलच्या महसूलात 8 टक्क्यांची 216 अब्ज डॉलरपर्यंत घसरण झाली. त्याचवेळी ऑपरेटींग नफ्यामध्ये 16 टक्के 60 अब्ज डॉलरपर्यंत घसरण झाली. जगभरात आयफोनची विक्री मंदावल्याने अॅपलच्या नफ्यामध्ये घट झाली. 2007 साली आयफोन पहिल्यांदा बाजारात आला. 2001 नंतर पहिल्यांदाच अॅपलच्या उत्पन्नात घट झाली आहे. 1.3 कोटी अमेरिकन डॉलरवरुन टिम कूक यांचे वेतन 87 लाख अमेरिकन डॉलर एवढे करण्यात आले आहे. 2015-16 मध्ये त्यांना 1.3 कोटी अमेरिकन डॉलर ऐवढे वेतन होते.
अॅपलच्या आयफोनने मोबाईलच्या बाजारपेठेत नवीन क्रांती घडवून आणली. अॅपलला सर्वाधिक उत्पन्न आयफोनच्या विक्रीतून मिळते. अन्य स्मार्टफोन्सच्या तुलनेत आयफोन सर्वाधिक महाग फोन आहे. तरीही जगभरात हा फोन खरेदी करणारा एक वर्ग आहे. त्यामुळे अॅपलला आयफोनकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत.