वॉशिंग्टन/लंडन : चंद्रयान-३च्या यशामुळे भारताचा अंतराळ संशोधन क्षेत्रातील महाशक्तींमध्ये समावेश झाला आहे. भारताच्या या कामगिरीबाबत अमेरिका, इंग्लंडसहित अनेक महत्त्वाच्या देशांतील प्रसारमाध्यमांनी मनापासून कौतुक केले आहे. तसेच कायम शत्रुभाव बाळगणाऱ्या पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनीही भारताचे कौतुक केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सपासून ते बीबीसी, गार्डीयन, वॉशिंग्टन पोस्टपर्यंत सर्वांनीच चंद्रयान-३च्या घटनेला ठळक प्रसिद्धी दिली आहे.
भारताच्या प्रभावी कामगिरीने जगभरातील प्रसारमाध्यमे प्रभावित झाली. दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे अवकाश संशोधनाच्या कार्यक्रमात एक मोलाची भर पडल्याचे म्हटले आहे.
दी वॉशिंग्टन पोस्टचे डेप्युटी एडिटर डेव्हिड वॉन ड्रेहले यांनी एक लेखही लिहिला आहे. त्यात त्यांनी भारताच्या अवकाश संशोधनातील कामगिरीचे कौतुक केले.तसेच युरोपीय देशांतील प्रसारमाध्यमांनीही चंद्रयान-३च्या यशस्वी गाथेची ठळक दखल घेतली आहे. (वृत्तसंस्था)
बीबीसी : दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक लँडिंग
बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या लेखाचे शीर्षक ‘चंद्रयान-३ : भारताचे चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर ऐतिहासिक लँडिंग’ असे देण्यात आले आहे. ही मोहीम भारतासाठी अतिशय महत्त्वाची होती. ती यशस्वी झाल्यामुळे अंतराळ संशोधनातील महाशक्तींमध्ये भारताचा समावेश झाला, असे त्या लेखात म्हटले आहे. सीएनएन वृत्तवाहिनीने देखील चंद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेबद्दल भारताचे कौतुक केले.
दी गार्डियन : चंद्रयान-३ मोहिमेचा गोडवा वाढला
दी गार्डियन या वृत्तपत्राचे विज्ञान विभागाचे संपादक इयान सॅम्पल यांनी एका लेखात म्हटले आहे की, चंद्राच्या विषुववृत्तापेक्षा दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३चे लँडिंग करणे हे अतिशय कठीण होते. तरीही ती मोहीम भारताने फत्ते केली. त्यामुळेच या कामगिरीचा गोडवा अधिक वाढला आहे. दी टेलिग्राफ या वृत्तपत्राने चंद्रयान-३ मोहिमेमधील महत्त्वाच्या घटकांचे विश्लेषण करणारा लेख व बातमी प्रसिद्ध केली आहे.
पाकिस्तानी माध्यमांकडूनही कौतुकाची थाप
पाकिस्तानातील दी डॉन, बिझनेस रेकॉर्डर, दुनिया न्यूज तसेच अन्य वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी चंद्रयान-३च्या यशाचे कौतुक केले. पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्रांनी ही बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध केली आहे. जिओ न्यूजच्या वेब डेस्कने चंद्रयान-३च्या यशोगाथेची कहाणी आपल्या बातमीमध्ये सविस्तर दिली आहे. पाकिस्तानचे माजी माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.