नवी दिल्ली - भारताचे चंद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. या लँडरचे सॉफ्ट लँडींग यशस्वी ठरल्यानंतर जगभरातून भारताचं कौतुक आहे. अमेरिका, रशिया, इंग्लंड, पाकिस्तानसह अनेक देशांकडून भारताच्या या अंतराळ मोहिमेचं कौतुक होत असताना एका इंग्रज पत्रकाराने भारताच्या चंद्रयान मोहिमेवरुन विचारलेला प्रश्न व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो अँकर कुत्सितपणे भारताला प्रश्न विचारत आहे. मात्र, चंद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर स्वत: ब्रिटीश हाय कमिशनरने हिंदी भाषेत ट्विट करत भारताचं कौतुक केलंय.
सोशल मीडियात एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, बीबीसीचा न्यूज अँकर भारतातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्येवर भाष्य करत आहेत. भारतात ७० कोटी जनतेला शौचालय नसतानाही तुम्ही चंद्रयान मोहिमेवर पैसे खर्च करत असल्याचं त्याने म्हटले होते. मात्र, त्याच्या या प्रश्नाला भारतीय चंद्रयान मोहिमेच्या यशस्वी लँडींगने मोठी चपराक बसलीय.
ब्रिटीश हाय कमिशनर एलेक्स एलिस यांनी चक्क हिंदी भाषेत ट्विट करुन भारताचं अभिनंदन आणि कौतुक केलंय. हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी अतिशय़ मोठा क्षण आहे, असे एलिस यांनी म्हटलं आहे. एलिस यांचं हे ट्विट म्हणजे भारताची ताकद जगाला आणि सर्वच देशांना दाखवून देणारं आहे. ज्या देशातील एका चॅनेलच्या पत्रकाराने भारताच्या चंद्रयान मोहिमेवर कुत्सितपणे प्रश्न विचारला होता. चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर त्याच ब्रिटीशच्या हाय कमिशनरांनी हिंदीत ट्विट करुन भारतीयांचं केलेलं कौतुक आणि हा जगातील सर्वच देशांसाठी असलेला मोठा क्षण म्हणणे ही त्या अँकरला जोराची चपराकच म्हणता येईल.
काय म्हणाला ब्रिटिश अँकर?
सोशल मीडियावर त्या वाहिनीच्या अँकरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो म्हणतो की, 'भारतात पायाभूत सुविधांचा अभाव आहे, भारतात अत्यंत गरिबी आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या दारिद्र्यात जगते, देशातील 700 मिलियनहून अधिक लोकांकडे शौचालये देखील नाहीत. अशा परिस्थितीत चंद्रयान-3 सारख्या महागड्या प्रकल्पावर इतके पैसे खर्च का करावे?'
आनंद महिंद्रांनी दिले सडेतोड उत्तर
या व्हिडिओला रिट्विट करत उद्योगपती आनंद महिंद्रांनीही उत्तर दिलंय, 'खरंच?? आमच्या देशात असलेली गरिबी, तुम्ही लादलेल्या अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती. या राजवटीने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. आमच्याकडून लुटलेली सर्वात मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता.'