बीजिंग- अमेरिकन विमान वाहतूक कंपन्यांना चीनने आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. आपल्या सर्व संकेतस्थळांवर तैवानचे नाव बदलण्याच्या सूचना चीनने दिल्या होत्या. मात्र काही कंपन्यांनी त्यामध्ये बदल केलेला नाही. यामुळे भडकलेल्या चीनने अमेरिकन कंपन्यांना धमकीवजा इशाराच दिला आहे.अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा, युनायटेड या विमान कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळांवर व सर्वत्र 'चायना तैवान' असे नाव वापरावे असे चीनने सांगितले आहे. अन्यथा इंटरनेटवर या संकेतस्थळांना बंद करण्यात येईल किंवा चीनी तिकीट दलालांकडून बहिष्कृत केले जाईल अशा परिणामांना सामोरे जावे लागेल असा इसारा चीनने दिला आहे. चीनच्या या मागणीला ट्रम्प यांच्या प्रशासनाने धुडकावून लावले होते. अमेरिकन विमान कंपन्यांच्या या कृतीमुळे चीन-अमेरिका संबंधावर परिणाम होतील असाही इशारा चीनने दिला आहे. 1949मध्ये चीनमध्ये उसळलेल्या यादवी युद्धानंतर चँग-कै-शैक चीनमधून तैवानला स्थायिक झाले होते. चीनमधील यादवी युद्धामध्ये माओ झेडाँग यांचा विजय होऊन ते सत्तेवर बसले होते. अमेरिकन सरकार आपल्या कंपन्यांना वन चायना धोरणाप्रमाणे वागण्याचे आदेश देऊन आपल्या संकेतस्थळांवर योग्य ते बदल करण्याचे आदेश देतील अशी आम्हाला आशा आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुअँग यांनी पत्रकारांना सांगितले.
तैवानचे नाव बदला नाहीतर...,अमेरिकन विमान कंपन्यांना चीनचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 1:53 PM