बीजिंग : जन्माला येणाऱ्या अपत्याला आयुष्यात ‘एचआयव्ही’ची लागण होऊ नये यासाठी त्याच्या भ्रूणामध्ये गुणसूत्रीय बदल करण्याच्या ‘बेकायदा आणि अनैतिक’ तंत्राचा वापर करून जगातील पहिल्या जुळ्या मुली जन्माला घातल्याचा दावा करणाºया हे जिआनकुई या वैज्ञानिकास चीनमधील न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.शेनझेन न्यायालयाने हे यांना तुरुंगवासाखेरीज ३० लाख युआन (४.३० लाख डॉलर) दंडही केल्याची माहिती चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिले. झांग रेन्ली आणि किन जिनझाओ या हे यांच्या दोन सहकाऱ्यांनाही अनुक्रमे दोन वर्षे कैद व १० लाख युआन दंड व दीड वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख युआन दंड शिक्षा देण्यात आल्या.डॉक्टर म्हणून अर्हता नसूनही या तिघांनी मानवी प्रजनानासाठी भ्रुणाच्या गुणसूत्रांत बदल करण्याच्या बेकायदा तंत्राचा वापर करून मुले जन्माला घातली. प्रसिद्धी व लाभासाठी हे कृत्य करून तिघांनी चीनमधील वैद्यकीय नीतीनियमांचे उल्लंघन करून वैद्यकव्यवसायाला बदनाम केले, असे न्यायालयाने नमूद केले आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले हे जिआनकुई चीनमधील शेन्झेन येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील माजी सहयोगी प्राध्यापक आहेत. भ्रुणाच्या गुणसूत्रात बदल करून ‘एचआयव्ही’मुक्त मूल जन्माला घालण्याचे ‘क्रिस्पर’ नावाचे तंत्रज्ञान आपण विकसित केले व त्याचा वापर करून जगातील पहिल्या जुळ््या मुली तीन वर्षांपूर्वी जन्माला आल्याची घोषणा हे यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये केली होती. त्यानंतर काही दिवसांनी हाँगकाँग येथील एका जैववैद्यकीय परिषदेत हे यांनी आपल्याला या कामाचा अभिमान असल्याचे सांगितले. जगभर टीका झाल्यानंतर हे यांना अटक केली. (वृत्तसंस्था)बव्हंशी देशांत बंदी‘क्रिस्पर’ हे गुणसूत्रांत बदल करण्याचे तंत्रज्ञान बेभरवशाचे असल्याने आणि त्याचा अघोरी व राक्षशी वृत्तीची पिढी जन्माला घालण्यासाठी दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याने हे तंत्रज्ञान व त्यासंबंधीचे संशोधन यावर जगातील बव्हंशी देशांमध्ये बंदी आहे. म्हणूनच हे यांनी उघडपणे हा दावा केल्यानंतर जगभरातील वैज्ञानिक व डॉक्टर वतुळांत साश्चर्य संताप व तीव्र नाराजीचा सूर उमटला होता.
भ्रूणांच्या गुणसूत्रांत बदल; वैज्ञानिकाला चीनमध्ये तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:03 AM