ढाका : राखीव जागांच्या मुद्द्यावरून बांगलादेशमधील हिंसक निदर्शनांची धग इतकी वाढली की, पंतप्रधान शेख हसीना यांना सोमवारी पदाचा राजीनामा देऊन तातडीने देश सोडावा लागला आणि भारताकडे पलायन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. मात्र, इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी म्हणाले की, बांगलादेशमधील घटनांची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्त्वाखाली सखाेल चाैकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे हसीना यांच्या इंग्लंडला जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बांगलादेशचा कारभार आता हंगामी सरकारकडून चालविला जाईल, अशी घोषणा लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी दूरचित्रवाहिनीद्वारे दिलेल्या एका संदेशात केली.
बांगलादेश का पेटला?
n२०१८मध्ये शेख हसीना सरकारने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने फिरविला. त्यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
n१९७१च्या स्वातंत्र्य युद्धातील सेनानींच्या
कुटुंबियांसाठी ३० टक्के आरक्षणाला देशभरात विराेध.
nआंदाेलकांना पाक समर्थक रझाकार म्हणणे हसीना यांना भाेवले. विद्यार्थी आंदाेलन हिंसक झाल्यानंतर २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर हसीना यांचे माैन.
nहसीनांवर हुकुमशाहीचा आराेप. विराेधकांना अटक, अनेकांचे एन्काउंटर हसीना यांच्या कार्यकाळात झाल्यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आराेप.
nआर्थिक प्रगतीचा लाभ सर्वांना नाही. त्यामुळे असमानता वाढली. बेराेजगारी वाढली आहे. १.८० काेटी तरुणांना नाेकऱ्या नाहीत.
हंगामी सरकारकडे आता देशाच्या कारभाराची सूत्रे
भारतात काय झाल्या घडामोडी?
डोवाल यांनी घेतली हसीना यांची भेट : शेख हसीना यांना घेऊन आलेले बांगलादेश हवाई दलाचे विमान जेव्हा गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावर उतरले, तेव्हा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. त्या लंडनला रवाना होताना भारतामध्ये काही काळ थांबणार हे निश्चित होते. त्यादृष्टीने बांगलादेश सरकार व लष्कराकडून भारत सरकारला विनंती करण्यात आली होती. या सर्व घडामोडींत अजित डोवाल यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली, असे सांगण्यात आले.
एस. जयशंकर यांनी दिली पंतप्रधानांना माहिती : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेऊन त्यांना बांगलादेशमधील स्थितीबद्दल माहिती दिली. शेजारी देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला आणखी काय वळण लागू शकते याबाबतही जयशंकर यांनी मोदी यांना अवगत केले.
राहुल गांधी यांची एस. जयशंकर यांच्याशी चर्चा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची संसद भवनात सोमवारी भेट घेऊन बांगलादेशमधील स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
सुरक्षा समितीच्या बैठकीत बांगलादेशवर चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली. त्यात बांगलादेशच्या स्थितीवर चर्चा झाली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आदी उपस्थित होते.
खालिदा झिया यांची सुटका होणार?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. शेख हसीना या बांगलादेशमधून परागंदा झाल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात खालिदा झिया यांना तुरुंगात धाडण्यात आले होते. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी या पक्षाच्या खालिदा या प्रमुख आहेत.
काय घडले?
nशेख हसीना यांच्या राजीनाम्याची घाेषणा हाेताच नागरिकांनी रस्त्यावर उतरत जल्लोष केला.
nहजारो निदर्शक हसीना यांच्या शासकीय निवासस्थानात शिरले. प्रचंड नासधूस केली.
nनिदर्शकांनी ढाक्यातील शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याची हातोड्याने नासधूस केली तसेच बंगबंधू संग्रहालयाला आग लावली.
nनिदर्शकांवर गोळीबार करू नये, असे आदेश दिल्याचे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी सांगितले.