इस्लामाबाद - पाकिस्तानात गव्हाचं पीठं चांगलंच महागलं असून एक किलो पीठाची किंमत ऐकून तुम्हीही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले असतानाही, केवळ काळ्या-बाजारातील विक्रीमुळे गव्हाच्या पीठाची किंमत वाढली आहे. त्यामुळे, पाकिस्तान सरकारला विदेशातून गहू आयात करावा लागत आहे.
पाकिस्तानात सध्या इम्रान खान यांच्या पक्षाचे सरकार असून कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच, अन्नधान्याच्या साठेबाजारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानमधील वर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, खुल्या बाजारात गव्हाच्या पिठाची किंमत 4 रुपयांनी वाढली असून 54 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील चपाती/भाकरी महागली आहे.
पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठीची चपाती, आवाक्याबाहेर गेली आहे. परिस्थिती एवढी गंभीर झाली की, सरकारला याप्रकरणी तत्काळ कॅबिनेटची बैठक बोलवावी लागली. त्यामध्ये, गव्हाची विदेशातून आयात करण्याचा निर्णय घेणे भाग पडले. यंदाच्या वर्षातील एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत गव्हाच्या पीठाच्या किंमतीत तब्बल 18.50 रुपयांची वाढ झाली आहे. काही बाजारांत यापेक्षाही जास्त दरवाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गव्हाचं पीठ दळणाऱ्या मिल मालकांनी ही साठेबाजी केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच तेथील संसदेत एक बिल मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार, 32 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तुंचा साठा किंवा काळाबाजार केल्यास 3 वर्षांची सजा आणि जप्त केलेल्या वस्तुंवर 50 टक्के दंड लावण्यात येणार आहे. मात्र, तरीही गव्हाचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरुच आहे.
इम्रान खान सरकारने गव्हाच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन गव्हाच्या आयातीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, सुरुवातीला रशिया आणि युक्रेन येथून 1 लाख 20 हजार टन गहू मागविण्यात येत आहे. या गव्हाची किंमत प्रतिटन 220-232 डॉलर एवढी आहे. त्यामुळे बाजारात 100 किलो गहू 4200 रुपये एवढ्या किंमतीत मिळणार आहे.