सिंगापूरमध्ये बुधवारी गांजाची तस्करी केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या एका व्यक्तीला फाशी देण्यात आली आहे. तंगराजू सुपैय्या असे या व्यक्तीचे नाव असून तो भारतीय वंशाचा व्यक्ती होता, मात्र त्याचे नागरिकत्व सिंगापूरचे होते. या व्यक्तीच्या कुटुंबाने सिंगापूर सरकारकडे माफीसाठी दयेचा अर्ज सादर केला होता. पण त्यांच्या कुटुंबीयांची मागणी ऐकली गेली नाही.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय तंगाराजू सुपैयाला 2013 मध्ये 1 किलोपेक्षा जास्त गांजाची तस्करी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. सिंगापूरमध्ये ड्रग्जच्या विरोधात अतिशय कडक नियम आहेत. या प्रकरणात कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंगापूरच्या मानवाधिकार कार्यकर्त्या कोकिला अन्नामलाई यांनी पुष्टी केली की, फाशीच्या अदल्या दिवशी सुपैय्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याला फाशी देण्यात आली.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, तंगाराजू सुपैय्या हा सिंगापूरहून मलेशियाला एक किलो गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी दोषी आढळला होता. पण, तो गांज्यासह रंगेहात पकडला गेला नव्हता. युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशनसह इतर अनेक मानवाधिकार संघटनांनी सुपैय्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला विरोध केला आहे. उद्योगपती रिचर्ड ब्रेसनन यांनीही या फाशीली विरोध केला.
सिंगापूरच्या गृह मंत्रालयाने या प्रकरणातील तथ्ये मांडताना सांगितले की, 46 वर्षीय सुपैय्याला 1017.9 ग्रॅम गांजाच्या तस्करीला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. अंमली पदार्थांचा गैरवापर कायद्यात गांजाचे प्रमाण 500 ग्रॅमपेक्षा जास्त असल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. सुपैयाच्या प्रकरणात गांजाचे प्रमाण 1017.9 ग्रॅम आहे.
गेल्या वर्षी 22 एप्रिल 2022 रोजी सिंगापूर सरकारने ड्रग्स तस्कर नागेंद्रन धर्मलिंगमला फाशीची शिक्षा सुनावली होती. नागेंद्रन धर्मलिंगमच्या बचाव पक्षाने नागेंद्रन मानसिक आजारी असल्याने त्याला फाशी देऊ नये, असा युक्तिवाद केला होता. पण न्यायालयाने ही याचिका मान्य केली नाही आणि अखेर त्याला फाशी देण्यात आली. नागेंद्रनला तीन चमचे हेरॉईनसह पकडण्यात आले होते.