लंडन : अत्यंत भव्य-दिव्य आणि ऐतिहासिक समारंभात शनिवारी चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनच्या महाराजेपदाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये झालेल्या या समारंभात चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचा पारंपरिक शाही मुकुट परिधान करण्यात आला व ते विधिवत सिंहासनारूढ झाले.
चार्ल्स तृतीय यांच्या मातोश्री महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना ७० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने राज्याभिषेक करण्यात आला होता, त्याच पद्धतीने हा सोहळाही पार पाडण्यात आला.
सुमारे १ हजार वर्षांची परंपरा असलेल्या या धार्मिक सोहळ्याच्या सुरुवातीला चार्ल्स तृतीय यांनी कँटरबरीचे आर्चबिशप यांच्यासमोर पदाची शपथ घेतली. ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक यांनी धार्मिक ग्रंथाच्या पाठाचे वाचन केले. चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांनी सोबत शपथ घेतली. देवाला साक्षी मानून दाेघांचा सांकेतिक स्वरूपात पुन्हा विवाह करण्यात आला.
चार्ल्स तृतीय यांनी जे राजसिंहासन ग्रहण केले, ते राजसिंहासन महाराजे जॉर्ज सहावे आणि महाराणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकासाठी मे १९३७ मध्ये निर्माण करण्यात आले होते. विशेष म्हणजे शनिवारप्रमाणे त्या दिवशीही समारंभस्थळी पाऊस पडला होता.
वेस्टमिन्स्टर ॲबे हे विलियम प्रथम यांच्या १०६६ साली झालेल्या राज्याभिषेकापासून प्रत्येक राज्याभिषेकाचा साक्षीदार राहिलेले आहे. चार्ल्स तृतीय (७४) आणि त्यांची पत्नी कॅमिला (७५) यांनी याच परंपरेचे पालन केले आहे.
हा सोहळा सर्वधर्मीय होता. हिंदू, शीख, मुस्लीम, बौद्ध आणि यहुदी धर्मांच्या प्रतिनिधींनी राज्याभिषेकापूर्वी ॲबेमध्ये एक शोभायात्रा काढली. राज्याभिषेकात चार्ल्स यांच्या मुकुट ग्रहणापूर्वी ब्रिटिश संसदेचे वरिष्ठ सभागृह हाउस ऑफ लॉर्ड्समधील भारतीय मुळाच्या सदस्यांनी चार्ल्स यांना पारंपरिक पोषाख सोपवला.
चार्ल्स आणि कॅमिला हे शाही बग्गीतून वेस्टमिन्स्टर राजवाड्यातून ॲबेपर्यंत पोहोचले. त्यांच्यासोबत सैन्याची एक तुकडीही होती. लंडनच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी त्यांचे चाहते झेंडे फडकावत होते.
२,२०० लोकांची उपस्थिती
ॲबेमध्ये विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह सुमारे २,२०० लोकांच्या समूहाने चार्ल्स यांचे स्वागत केले. भारताच्या वतीने उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांनी उपस्थिती लावली. अन्य राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांसमवेत ते बसले होते.
राजेशाही विरोधकांची निदर्शने
ब्रिटनमधील राजेशाहीच्या विरोधकांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या निषेधार्थ ट्राफलगर चौकात निदर्शने केली. राजेशाही संपविण्याची मागणी आंदोलक करीत होते. काही निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.