मुंबई - 1993 बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आपल्या कुटुंबासोबत पाकिस्तानला शिफ्ट झाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत गेलेल्या त्याचा गँगमधील लोकांमध्ये छोटा शकीलदेखील होता. छोटा शकील सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रांचच्या एका अधिका-याने दिली आहे. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डी कंपनीत फूट पडल्याच्या पार्श्वभुमीवर छोटा शकीलचं अशा प्रकारे गायब होणं मोठी बातमी आहे.
अधिका-याने सांगितल्यानुसार, छोटा शकीलला तीन महिन्यांपुर्वी पाकिस्तानात शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर तो दिसलाच नाही. तो दुस-या कोणत्या देशात गेला आहे का याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न भारतीय गुप्तचर यंत्रणा करत आहे. दाऊद इब्राहिमसोबत झालेल्या वादामुळे छोटा शकीलने पाकिस्तान सोडलं असेल असं म्हणू शकत नाही. तो अनेकदा दुस-या देशांमध्ये जात असतो. त्याचा एक जवळचा नातेवाईक अमेरिकेत राहतो. दोन वर्षांपुर्वी त्याला भेटण्यासाठी तो गेला होता. यानंतर काही दिवस तो ऑस्ट्रेलियातही थांबला होता. छोटा राजन त्यावेळी तिथे राहत होता. असं म्हणतात की, छोटा शकीलला त्याच्या एका खास माणसाने, ज्याला दुबईत अटक करण्यात आली होती त्याने छोटा राजनच्या ठिकाणांची माहिती दिली होती. त्यानंतरच राजनने तेथून पळ काढला होता. पण नंतर इंडोनेशियामधील बाली शहरातून त्याला पकडण्यात आलं होतं.
छोटा शकील कोणत्या कारणासाठी पाकिस्तानबाहेर आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. शकीलने काही टीव्ही चॅनल्सला दिलेल्या मुलाखतीत दाऊदसोबत वाद झाल्याच्या वृत्तांचं खंडन केलं आहे. सोबतच दाऊदच डी कंपनीचा बॉस असल्याचं त्याने म्हटलं होतं. मुंबई पोलिसातील एका अधिका-याने दाऊदपासून वेगळं होणं शकीलला महाग पडू शकतं, त्यामुळे त्याच्या बाजूने बोलणं शकीलची मजबूरी आहे.
अंडरवर्ल्डमध्ये फूट; वेगळे झाले दाऊद आणि छोटा शकीलगेल्या कित्येक वर्षापासून सोबत असणाऱ्या अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त काही दिवसांपुर्वी आलं होतं. भारताच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या सुत्रांकडून ही माहिती मिळाली होती. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,शकील आणि दाऊदचे रस्ते आता वेगळे झाले आहेत. शकील जवळपास 1980 साली मुंबई सोडल्यानंतर दाऊदकडे कराचीच्या रेडक्लिफ भागात राहत होता. पण आता शकीलने स्वतःचा ठिकाणा बदलला असून तो कुठे आहे ? याबद्दलची माहिती कोणालाही नाही.
दाऊद आणि शकीलचं वेगळं होण्याचा कारण त्या दोघांमध्ये नुकतीच झालेली भांडण असू शकतं, अशी शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. शकील हा दाऊदच्या सगळ्यात जवळच्या लोकांपैकी एक असून तो गेल्या तीन दशकांपासून त्याच्यासोबत राहतो आहे. दाऊद व शकील दोघांनी मिळून गँग चालविली होती. शकीलचं वय सध्या जवळपास 50 इतकं असेल. शकील व दाऊद या दोघांमध्ये नुकतंच दाऊदचा लहान भाऊ अनीसचा गँगच्या कारभारातील हस्तक्षेपामुळे वाद झाले होते. त्याच वादामुळे शकील वेगळा झाल्याचं बोललं जातं आहे.
दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याची बातमी आल्याने पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या आहेत. मुंबई, दुबई आणि पाकिस्तान या ठिकाणी डी गँगच्या काही मोजक्या लोकांनाच दाऊद आणि छोटा शकील यांच्यात झालेल्या वादाची माहिती आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. तसेच छोटा शकीलही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. डी गँगपासून छोटा शकीलने फारकत घेतल्यामुळे आता एकाच गँगच्या दोन टोळ्या आणि त्यातील नवा वाद समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.