कपडे धुण्यासाठी आपण डिटर्जंटचा हमखास वापर करतो. ज्यामुळे कपडे स्वच्छ धुतले जातात. अनेकदा डिटर्जंट पावडरमुळे काहीजणांना अलर्जी होते. खाज होणं ही तक्रार याआधी देखील समोर आली आहे. पण कपडे धुण्यासाठी वापरलं जाणारं डिटर्जंट लहान मुलांसाठी किती घातक ठरू शकतं, याचंच एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. डिटर्जंटने धुतलेले कपडे घातल्यानंतर 3 वर्षांच्या चिमुकल्याची भयंकर अवस्था झाली आहे. त्याची त्वचा भाजली आहे.
यूकेतील ही धक्कादायक घटना घडली आहे. ससेक्समध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगत इतर पालकांना सावध केलं आहे. या महिलेचा मुलगा डिटर्जंट टॅबलेटमुळे गंभीररित्या भाजला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, एका 28 वर्षीय महिलेने सांगितलं, मुलाने कपडे घालताच सुरुवातीला त्याला जळजळल्यासारखं वाटू लागलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची त्वचा भाजल्यासारखी झाली. त्वचेचा रंग लाल झाला होता, त्यावर जखम झाली होती.
महिला मुलाला घेऊन रुग्णालयात गेली. तिथं अशी बरीच प्रकरणं समोर आल्याचं तिला समजलं. महिलेने मुलाचे कपडे धुण्यासाठी डिटर्जंट टॅबलेटचा वापर केला होता. जे वॉशिंग मशीनमध्ये नीट मिसळलं नव्हतं. हे टॅबलेट मुलाच्या कपड्यातून त्याच्या हातावर विरघळलं. ज्यामुळे त्याचा हात भाजला, असं या महिलेने सांगितलं.
डिटर्जंटमधील केमिकल धोकादायक असतं. त्यामुळे मुलांना डिटर्जेंटपासून दूर ठेवा, असं आवाहन तिने आता इतर पालकांना केलं आहे. तसंच अशा प्रोडक्टवर बंदी आणण्याची मागणीही तिने केली आहे. तिने याबाबत संबंधित डिटर्जंट कंपनीकडे तक्रारही केली, याची भरपाईही मागितली. पण कंपनीकडून काहीच मदत मिळाली नसल्याचं तिने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.