चियांग राय (थायलंड): थायलँड व म्यानमारच्या सीमेलगत थाम लुआंग गुहेत अडकून पडल्यानंतर २३ दिवसांनी सुखरूप बाहर काढलेली स्थानिक फूटबॉल संघातील १२ मुले आणि त्यांचा प्रशिक्षक यांची प्रकृती सुधारत असून, त्यांना येत्या गुरुवारी घरी सोडण्यात येईल. आरोग्यमंत्री पियासकोल सत्यद्रोन यांनी शनिवारी या मुलांच्या ख्यालीखुशालीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यात ही मुले आनंदी व उत्साही दिसत होती. त्यांनी सुटका करणाऱ्याचे मनापासून आभार मानले. अनेक मुलांनी घरची खूप आठवण येत असल्याचे सांगून काहींनी आवडते खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा प्रदर्शित केली.प्रकृतीत सुधारणाही मुले ११ ते १६ वयोगटांतील आहेत. गुहेतून बाहेर काढले, तेव्हा काहींना न्यूमोनिया झाला होता, तर काहींचे वजन पाच किलो घटले होते, पण आता सर्वांची प्रकृती झपाट्याने सुधारत आहे, असे आरोग्यमंत्री म्हणाले. जगभर मिळालेल्या प्रसिद्धीचा मुलांच्या कोवळ्या मनांवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
गुहेतून वाचलेली मुले गुरुवारी जाणार घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 4:30 AM