वॉशिंग्टन - अमेरिकेतील विस्काॅन्सिन राज्यात एका ख्रिसमस परेडमध्ये सहभागी झालेल्या लाेकांना भरधाव एसयूव्हीने चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहे. परेडमध्ये लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता.
विस्काॅन्सिन राज्यातील वाॅकेशा या शहरात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओदेखील काही स्थानिकांनी शेअर केला आहे. लाल रंगाची एसयूव्ही भरधाव वेगाने रॅलीमध्ये घुसली आणि त्याखाली अनेक जण चिरडल्या गेले. पाेलिसांची गाडीही एसयूव्हीचा पाठलाग करताना व्हिडिओमध्ये दिसते. ही दहशतवादी घटना नसल्याचे पाेलिसांनी प्राथमिक तपासानंतर सांगितले आहे. शहराचे पाेलीस प्रमुख डॅन थाॅम्पसन यांनी सांगितले, की या गाडीतून एक आराेपी पळून जात हाेता. पाेलीस त्याचा पाठलाग करत हाेते. त्याला नंतर अटक करण्यात आली आहे. गाडीने अनेकांना चिरडले आहे. काही जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नेमके काय घडले ?वाॅकेश शहरात ख्रिसमस परेड आयाेजित करण्यात आली हाेती. लहान मुले आणि नागरिक परेडचा आनंद घेत हाेते. परेडच्या भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले हाेते. मात्र, आराेपीने बॅरिकेट ताेडून परेडच्या मार्गावर भरधाव वेगाने गाडी नेली. हा सिनेस्टाइल पाठलाग काही जणांच्या माेबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली हाेती.