कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान मास्क न घालता सेल्फी काढणं एका देशाच्या राष्ट्रपतींना चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल 2.57 लाखांचा दंड भरावा लागला आहे.
चिली देशाचे राष्ट्रपती सेबेस्टियन पिनेरा (Chilean President Sebastian Pinera) यांना 3500 डॉलर्स म्हणजे जवळपास 2.57 लाखांचा दंड भरावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रपतींना दंड भरावा लागला आहे. राष्ट्रपतींनी विना मास्क महिलेसोबत समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढला आहे. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
चिलीच्या आरोग्य विभागाने या व्हायरल फोटोवर प्रश्न उपस्थित केला आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्स दोन्ही या फोटोत न बाळगल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रपतींना दंड भरावा लागला आहे. राष्ट्रपती पिनेरा यांचा विना मास्कचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वांसमोर जाहीर माफी मागत दंड भरण्याची वेळ चिलीच्या राष्ट्रपतींवर आली आहे.
कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. काही ठिकाणी कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात झाली असून त्याचे साईड इफेक्ट समोर येत आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी कोरोना लसीवर जोरदार टीकास्त्र सो़डलं आहे. तसेच अजब दावा केला आहे. Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल असं म्हटलं आहे. अमेरिकन कंपनी फायझरने कोरोनावर लस विकसित केली आहे. मात्र ही लस घेतली तर लोक मगर होतील आणि महिलांना दाढी येईल अशी शंका राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली आहे. बोल्सोनारो हे कोरोना व्हायरसची तीव्रता आधीपासूनच नाकारत आले आहेत. या आठवड्यात त्यांनी देशात लसीकरण सुरू झालं तरी आपण ही लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.