अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. याच दरम्यान स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना सणसणीत टोला लगावला आहे.
16 वर्षीय ग्रेटा थनबर्गने डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच शब्दात सुनावले आहे. ग्रेटाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शांत व्हा आणि एखादा चित्रपट पाहा आणि रागावर नियंत्रण मिळवण्यावर थोडं काम करा" असं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. "हे खूपच हस्यास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या रागावर नियंत्रण न ठेवता येण्याच्या समस्येवर थोडं काम केलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी आपल्या एखाद्या मित्राबरोबर छानसा जुना चित्रपट पाहावा. शांत व्हा ट्रम्प.. शांत व्हा" असं ग्रेटाने म्हटलं आहे.
ग्रेटाने ट्रम्प यांना त्यांच्याच एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. ग्रेटाने हे ट्विट ट्रम्प यांच्या मतमोजणी थांबवण्यासंदर्भात केलेल्या ट्विटवर उत्तर देताना केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जर तुम्ही वैध मतांची मोजणी केली तर मी सहजपणे जिंकत आहे. मात्र जर तुम्ही अवैध मतांची (मेल इन बॅलेट्स) मोजणी केली तर डेमोक्रॅट आमच्याकडून विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मी अनेक मोठ्या राज्यांमध्ये ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप
विविध माध्यमांनी दाखवलेल्या ओपिनियन पोल्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. ओपिनियन पोल्स घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण देशाता ब्लू व्हेव दाखवली. प्रत्यक्षात अशी कुठलीही लाट नव्हती. संपूर्ण देशात मोठी रेड व्हेव आहे. याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच मेल इन बॅलेट्समधील एकतर्फी कौल हा धक्कादायक असल्याचेही ते म्हणाले. मेल इन बॅलेट्स एकतर्फी डेमोक्रॅटच्या बाजूने दिसत आहेत. हा एक भ्रष्ट प्रकार आहे आणि लोकांनाही भ्रष्ट बनवत आहे.