7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिण भागात हल्ला केला होता. त्याच्या तपासात एकामागून एक धक्कादायक पुरावे सापडत आहेत. पोलीस आणि या हल्लाला बळी पडलेल्या मुलीच्या संभाषणाची माहिती आता समोर आली आहे. 15 वर्षांच्या मुलीसमोर एक दहशतवादी उभा होता. याच दरम्यान तिने मदतीसाठी पोलिसांना फोन केला होता.
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, फोन कॉल दरम्यान मुलगी दहशतवाद्यासमोर दयेची भीक मागत असल्याचं ऐकू आलं. तिला इजा करू नये असं ती म्हणत होती. 'उद्या माझी शाळा आहे, मला एकटीला सोडा' असं मुलगी त्यांना म्हणत होती. नंतर दहशतवाद्याने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला आणि पोलीस ऑपरेटरशी अरबीमध्ये बोलू लागला. पोलीस अधिकाऱ्याने त्याला मुलीला इजा करण्यापासून रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण तो तयार झाला नाही. दहशतवाद्याने या मुलीची हत्या केली.
याच ठिकाणाहून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका महिलेने स्वतःच्या डोळ्यांनी हमासच्या दहशतवाद्याला दुसऱ्या महिलेची हत्या करताना पाहिलं. तिने सांगितलं की, दहशतवाद्यांनी महिलेच्या डोक्यात गोळी झाडण्यापूर्वी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. हे लोक त्यांनी केलेले गुन्हे कॅमेऱ्यात रेकॉर्डही करत होते. जे गाझा येथील हेडक्वार्टरमध्ये बसलेले लाईव्ह पाहू शकत होते.
याशिवाय अनेक व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये हमासचे लोक इस्रायली लोकांची हत्या करताना दिसत होते. गाझामध्ये त्याने 100 हून अधिक लोकांना ओलीसही ठेवले होते. फक्त दोन- चार लोकांना सोडण्यात आलं आहे, बाकीचे अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. त्याचा बदला म्हणून हमासचे गाझावरील हल्ले सुरूच आहेत.