थिम्पू : दक्षिण आशियाई राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची क्षमता सामावलेल्या भारतीय राजकारणातील नव्या पर्वाकडे शेजारी देश फार सावधपणे लक्ष ठेवून आहेत. एका बाजूला विस्तारवादी बलाढ्य चीनच्या आगळिकींना तोंड देणे भाग असलेल्या भुतानसाठी तर दुसरा शेजारी असलेल्या भारताबरोबरचे नाते संवेदनशील आहे. भारतातल्या राजकीय आणि सामाजिक बदलांचे पडसाद या देशातील समाजजीवनावर फार तातडीने पडतात. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी भुतानला दिलेला अग्रक्रम या देशासाठी मोठा दिलासाच ठरला आहे. थिम्पू, पुनाखा या भागात फिरताना भेटणारे वाहनचालक, गाइड्स, दुकानदार अशी सारीच सर्वसामान्य माणसे भारताबद्दल फार प्रेमाने आणि औत्सुक्याने बोलतात.एरव्ही पश्चिमेकडे नजर लावून असलेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाला आशियाई स्वाभिमानाची ताकद देणारे पहिले पाऊल नरेंद्र मोदी यांनी थेट शपथविधीच्या दिवशीच उचलले होते. रुढ राजनैतिक संकेत बाजूला ठेवून शपथविधीनंतरच्या शाही खान्याप्रसंगी मोदींनी भुतानचे पंतप्रधान ल्योंंचेन टोग्बे यांना शेजारी सन्मानाने बसवून घेतले होते, याचे दाखले भुतानमधली वर्तमानपत्रे आजही देताना दिसतात. दक्षिण आशियाई राष्ट्र समूहाच्या नेतृत्वाच्या चाव्या हाती ठेवून जागतिक राजकारण-अर्थकारणात भारताचे वर्चस्व सिद्ध करणे, हा नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीचा पाया असेल, त्यांची भुतान भेट हे त्याचे निदर्शक असल्याचे मत येथील वर्तमानपत्रात व्यक्त होताना दिसते. घनदाट जंगले आणि उत्तुंग हिमालयाच्या बेचक्यातल्या चिमुकल्या भुतानच्या उर्वरित सीमा दोन बलाढ्य शेजाऱ्यांनी घेरून टाकलेल्या आहेत. उत्तरेला चीन आणि दक्षिणेकडे भारत! थिम्पूमध्ये अलीकडेच प्रचंड मोठी वकिलात सुरू करून ‘मैत्री’साठी सरसावलेल्या चीनबद्दल सामान्य भुतानी माणसांबरोबरच राजकीय निरीक्षकांमध्येही संशयाची भावना आहे़ डोंगराळ भागातील रस्ते बांधणीच्या तंत्रज्ञानापासून भुतानी तरुणांच्या मारुती अल्टो गाडीपर्यंत सारे काही पुरवणाऱ्या शेजारी भारताविषयी मोठ्या भावासारखा आदर! शांतताप्रिय भुतानला आपल्या व्यवस्थेची नवी घडी बसवण्यासाठी भारतासारख्या प्रबळ, सशक्त लोकशाहीचा मोठा आधार वाटतो. पुढल्या पिढीच्या कौशल्य-विकसनासाठीचे भुतानचे नियोजनही सध्या भारताच्या आधारानेच सुरू आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची भेट सामान्य नागरिकांनाही महत्त्वाची वाटते आहे, ती म्हणूनच! (वृत्तसंस्था)
चिमुकल्या भुतानची भारतावर मदार
By admin | Published: June 15, 2014 2:52 AM