बीजिंग : अवघ्या जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोना विषाणू उत्पत्तीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेमधील (WHO) आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीनमध्ये जाऊन संशोधन करणार होते. मात्र, चीनने या तज्ज्ञांच्या टीमला परवानगी होती. अखेर चीनने नरमला असून, WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाला परवानगी देण्यात आली आहे.
चीनमध्ये जाऊन कोरोना विषाणू उत्पत्ती, संसर्ग, प्रसार याचा शोध घेण्यासाठी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाला चीन सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२१ रोजी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीन दौऱ्यावर जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे काही तज्ज्ञ गुरुवार, १४ जानेवारी २०२१ रोजी चीनमध्ये येऊन कोरोना विषाणू उत्पत्तीबाबत संशोधन करणार आहेत. चीनचा राष्ट्रीय आरोग्य आयोगातील समकक्ष अधिकाऱ्यांची WHO च्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून देण्यात आली.
WHO तज्ज्ञांचे पथक वुहान शहराचा दौरा करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चीनकडून WHO तज्ज्ञांच्या दौऱ्याबाबत अधिक आणि विस्तृत माहिती देण्यात आलेली नाही. चीनच्या वुहान येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. यामुळे जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या चाचणी आणि अभ्यासासाठी जानेवारी महिन्यांत १० सदस्यांची टीम चीनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, चीनमधील अधिकाऱ्यांनी याबाबतची परवानगी नाकारली होती.
दरम्यान, चीनच्या अधिकाऱ्यांनी आमच्या टीमला चीनमध्ये येण्यासाठीच्या आवश्यक परवानग्या दिल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या पथकाला चीनमध्ये येण्यास चीन सरकारने ऐनवेळी नकार दिल्याने आम्ही अतिशय नाराज आहोत. असे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रॉस घेब्रेसस यांनी म्हटले होते. कोरोना विषाणूच्या उद्रेकावरुन जागतिक पातळीवर चीनवर जोरदार टीका करण्यात आली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला थेट 'चीनी व्हायरस' असे संबोधले होते.