बिजिंग : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर १० टक्के आयात कर लादल्यानंतर आता चीननेही प्रतिकारवाई करीत अमेरिकी वस्तूंवर १० ते १५ टक्के आयात कर लावण्याची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे जगात व्यापारी युद्धाला तोंड फुटले आहे.
चीनच्या वित्त मंत्रालयाने यासंबंधीची घोषणा केली. अमेरिकेतून आयात केला जाणारा कोळसा आणि द्रवरूप नैसर्गिक वायूवर १५ टक्के, तर कृषी क्षेत्राशी संबंधित वस्तू, कच्चे तेल, वाहनाच्या सुट्या भागांवर १० टक्के आयात कर लावला आहे.
१० फेब्रुवारीपासून हे कर लागू होतील. चीनने अमेरिकेला काही खनिज द्रव्यांची निर्यात करण्यावरही बंधने घातली आहेत. तसेच अमेरिकेची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी गुगलच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे अमेरिकेत महागाई वाढू शकते, हे ट्रम्प यांनी मान्य केले आहे.
मात्र, अवैध प्रवास रोखणे, आणि देशांतील उद्योगास बळ देण्यासाठी चढे कर आवश्यकच होते, असे ट्रम्प यांनी म्हटले.
जागतिक व्यापार संघटनेत चीन दाद मागणार
दरम्यान, अमेरिकेने लादलेल्या • करांविरोधात जागतिक व्यापार संघटनेत आव्हान देण्यात येणार असल्याची घोषणा चीनचे वाणिज्य मंत्रालय व सीमा शुल्क प्रशासनाने याआधीच केली आहे.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच चीन, मेक्सिका आणि कॅनडा या देशांवर कर कारवाईची घोषणा केली होती.
मात्र, मेक्सिको आणि कॅनडावर लादण्यात आलेल्या २५ टक्के करास ट्रम्प प्रशासनाने ३० दिवसांची स्थगिती दिली आहे. चीनला मात्र अशी सवलत देण्यात आलेली नाही.