शांघाय : कोरोना व्हायरसने (Corona Virus) चीनची (China)साथ सोडलेली नाही. पुन्हा एकदा कोरोनाने इथल्या लोकांवर कहर केला आहे. हजारो लोकांना संसर्ग होत आहे. कोरोनाच्या नव्या लाटेचा सर्वात मोठा परिणाम शांघायमध्ये (Shanghai) दिसून येत आहे. येथे पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. प्रशासन कोरोना तपासणीवर अधिक भर देत आहे. यासोबतच लोकांना कोरोना महामारीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले जात आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शांघायमध्ये राहणाऱ्या लोकांना शक्य ती सर्व मदत देण्याचा स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न आहे, मात्र ही मदत पुरेशी नसल्याचे लोकांना वाटते. लोकांनी असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत, जिथे ते आपापल्या घराच्या बाल्कनीत गाणी गाऊन विरोध करत आहेत, त्याचवेळी ड्रोनद्वारे घोषणा केली जाते की त्यांनी हे करू नका, घराच्या खिडक्या बंद ठेवा. तसेच, लोकांनी आपल्या स्वातंत्र्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवावे आणि गाणी गाऊ नयेत असेही घोषित केले आहे.
याचबरोबर, आणखी एका व्हिडिओमध्ये, काही आरोग्य कर्मचारी शांघायच्या रस्त्यावर मनोरंजक घोषणा करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आरोग्य कर्मचारी लोकांना सांगत आहेत की, 'आज रात्रीपासून जोडप्यांनी एकत्र झोपू नये, त्यांनी चुंबन घेऊ नये, त्यांनी एकमेकांना मिठी मारणेही टाळावे. याशिवाय दोघांनी एकत्र जेवण करू नये.'
जवळपास एक आठवड्यापूर्वी, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये चार पायांचा रोबोट शांघायच्या रस्त्यावर गस्त घालत होता आणि लोकांना लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन करत होता. विशेष म्हणजे, निर्बंधांमुळे अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणाबाबत लोकांमध्ये असंतोष वाढत आहे.
दुसरीकडे, शहर प्रशासनाने समस्या मान्य करून परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. शांघायचे उपमहापौर चेन टोंग यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "शांघायमध्ये तांदूळ आणि मांसासारख्या मुख्य पदार्थांचा पुरेसा साठा आहे, परंतु महामारी नियंत्रण उपायांमुळे वितरणात समस्या निर्माण होत आहे. तसेच, शहरातील काही घाऊक बाजारपेठा आणि खाद्यपदार्थांची दुकाने पुन्हा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे."