ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 26 - भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असलेल्या संबंधांवर चीन आगपाखड करतोय. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान होत असलेल्या डेडिकेटेड एअर कॉरिडॉरवरून चिनी माध्यमांनी टीका केली आहे. भारताकडून अफगाणिस्तानमध्ये तयार होत असलेला कॉरिडॉर हा भारताचा हेकेखोरपणा असल्याची टिपण्णी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून करण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान बनत असलेला कॉरिडॉर हा चीन-पाकिस्तानमधल्या आर्थिक कॉरिडॉरला (सीपीइसी) चोख प्रत्युत्तर समजले जाते. गेल्याच आठवड्यात या कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले होते. भारत आणि अफगाणिस्तानमधील द्विपक्षीय व्यावसायिक संबंध वृद्धिंगत होण्यासोबतच मध्य आशियाई देशांना भारतीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशानं हा कॉरिडॉर तयार केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत अफगाणिस्तानसोबत व्यापारी संबंध वाढवण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी भारतानं अनेक पर्यायांचा विचारसुद्धा केला आहे. भारत अफगाणिस्तान आणि इराणच्या सहकार्यानं चाबहार बंदर विकसित करत असून, त्या माध्यमातून समुद्री मार्गे व्यापार वाढवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. चाबहार बंदराच्या माध्यमातून दूरच्या देशांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत प्रयत्न करणार आहे. भारत अफगाणिस्तान आणि इराणसोबत व्यावसायिक संबंध वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानकडे दुर्लक्ष करतोय. भारताची समुद्रीमार्गे संपर्क वाढवून क्षेत्रिय विकास करण्याची मनीषा आहे. त्यामुळे भारत आशियाई देशांसोबत भागीदारी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र यातून भारताची हेकेखोर आणि राजकीय इच्छाशक्ती स्पष्टपणे दिसतेय, असेही या लेखात म्हटले आहे.
चीनचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट वन बेल्ड वन रोडच्या प्रकल्पांतर्गत तयार होणा-या चीन-पाकिस्तानच्या आर्थिक कॉरिडोर(CPEC)ला पाकव्याप्त काश्मीरमधून जोरदार विरोध सुरू आहे. या प्रोजेक्टविरोधात पाकव्याप्त काश्मीरमधून अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत. गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील अनेक आंदोलकांनी CPEC बनवण्याला विरोध दर्शवला आहे. गिलगिट, हुंजा, स्कर्दू आणि गिजरमध्ये कोराकोरम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, बलावरिस्तान नॅशनल स्टुडंट्स ऑर्गनायझेशन, गिलगिट-बाल्टिस्थान युनायटेड मूव्हमेंट आणि बलावरिस्तान नॅशनल फ्रंटसारख्या विद्यार्थी आणि राजकीय संघटना CPECला विरोध करत आहेत.