बिजिंग : कोरोनाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. या धोकादायक व्हायरसचा पहिला उद्रेक झालेल्या चीनमध्ये नवीन रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून आता युरोप आणि अमेरिकेमध्ये वाढू लागली आहे. या व्हायरसची पहिली धोक्याची सूचना देणाऱ्या डॉक्टरचीचीनने माफी मागितली आहे. चीनला ही उपरती एवढा नरसंहार झाल्यानंतर सुचली आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये वुहानच्या एका हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यावेळी तेथील डॉक्टर वेनलियांग यांनी ही धोक्याची सूचना चीनी सोशल मीडिया अप वुई चॅटवर दिला होता. त्यांनी व्हिडीओ जारी करत त्यांच्या सहकारी डॉक्टरांना सावध केले होते. मात्र, याकडे चीन सरकारने दुर्लक्ष केले होते. अखेर फेब्रुवारीमध्ये याच व्हायरसमुळे वेनलियांग यांचा मृत्य झाला होता.
आता चीनचे कम्युनिस्ट सरकार त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमध्ये तीन हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० हजारहून अधिक जण कोरोना संक्रमित आहेत. यामुळे चीनने ली वेनलियांग यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे.
द गार्डियनया वृत्तपत्रानुसार चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या समितीने वेनलियांग यांच्याबाबतीत त्यांच्याकडून चूक झाली आहे. सत्ताधारी पक्षाला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागत आहे. त्यांनी याचे खापर पोलिसांवर फोडण्यास सुरुवात केली आहे. वेनलियांग यांना तोंड न उघडण्याची धमकी देणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
डॉक्टर वेनलियांग यांनी त्यांच्या मित्रांना व्हिडीओ पाठवून सावध राहण्यास सांगितले होते. यामध्ये त्यांनी सार्स सारखा व्हायरस सापडला असल्याचे सांगितले होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना पाठविण्यात आला. पोलिसांनी वेनलियांग यांच्यावर अफवा पसरवण्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. मात्र, वेनलियांग यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आणि या व्हायरसने चीनलाच नाही तर जगालाच कवेत घेतले आहे. वेनलियांच्या यांच्या मृत्यूनंतर लोकांनी सरकारवर राग व्यक्त केला होता. जर वेनलियांग यांचा इशारा गंभीरतेने घेतला असता तर एवढ्या लोकांना जीव गमवावा लागाल नसता, असा आरोप करण्यात येत आहे.