सिडनी : एकीकडे युरोप आणि आशियाई देश रशियामध्ये महायुद्धाची कधी ठिणगी पडेल असे दिसत आहे. त्यातच आता चीनने ऑस्ट्रेलियाच्या लष्करी विमानावर लेजर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. चीन काही केल्या कोणाला जुमानत नाहीय. चीनच्या युद्धनौकेने गस्तीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विमानावर लेझर मारल्याने अपघात होता होता वाचला आहे.
ऑस्ट्रेलियाचे टेहळणी विमान पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्याच समुद्रात होते, असा दावा करण्यात आला आहे. असे असतानाही चीनने त्या विमानावर मिलिट्री ग्रेड लेझर रोखल्याने विमानाची सुरक्षा धोक्यात आली होती. मिलिट्री ग्रेड लेझर लाईटचा वापर वैमिनिकांना आंधळे करणे शिवाय विमानातील उपकरणे नष्ट करण्यासाठी केला जातो. गेल्या काही काळापासून चीन आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध तणावाचे आहेत. यामुळे चीनने रहे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
या संदर्भात ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी - नेव्ही (पीएलए-एन) जहाजातून ऑस्ट्रेलियन सागरी गस्ती विमान P-8A पोसेडॉनवर लष्करी दर्जाचा लेझर लाईट टाकण्यात आला. हे जहाज गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे. लुआंग क्लास गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयरवरून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. हे लष्करी जहाज आणखी एका पीएलए-एन जहाजासोबत अराफुरा समुद्रात होते.
चीन हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांमधील संबंध अलीकडच्या काळात बिघडले आहेत. 2018 मध्ये, ऑस्ट्रेलियाने त्याच्या 5G ब्रॉडबँड नेटवर्कवरून Huawei तंत्रज्ञानाला रोखले होते. याचबरोबर परकीय राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध कायदे कडक केले आहेत. याव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या उत्पत्तीची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली होती. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.