बीजिंग: चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणू जगभरात पसरला. गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. मात्र अद्याप तरी या संकटाचा शेवट दूरच आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झाल्या असल्या तरी कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट चिंतेत भर घालत आहेत. त्यातच आता चीनमध्ये 'बॅटवूमन' नावानं प्रसिद्ध असलेल्या शास्त्रज्ञ शी जेंगलीनं कोरोनाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
लोकांना कोरोना विषाणूसोबत जगणं शिकावं लागेल. या विषाणूचे विविध व्हेरिएंट येत राहतील. ते जगभर पसरत राहतील, असं जेंगली यांनी म्हटलं आहे. जेंगली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या उपसंचालिका आहेत. याच इन्स्टिट्यूटमधून जगभरात कोरोनाचा प्रसार झाल्याचा संशय अमेरिकेसह अनेक देशांना आहे.
वॉयरोलॉजी विषयात तज्ज्ञ असलेल्या जेंगली चिनी माध्यमांमध्ये बॅट वूमन नावानं ओळखल्या जातात. त्यांचा समावेश टाईम मॅगझिननं २०२० च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता. जेंगली यांच्यामुळेच देश कोरोना संकटातून लवकर बाहेर पडला, असं चिनी जनतेला वाटतं. चिनी सरकार आणि जनता यांच्यासाठी जेंगली एका नायिकेसारख्या आहेत. देशात त्यांना आदराचं स्थान आहे
आपण कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, असं जेंगली एका मुलाखतीत म्हणाल्या. 'कोरोना विषाणूची भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र त्यासोबत बराच काळ राहण्याची तयार आपण ठेवायला हवी. कोरोना रुग्णांच्या संख्येत सध्या वाढ होत आहे. त्यामुळे विषाणू म्युटेट होण्याची शक्यतादेखील वाढली आहे. कोरोनाचे आणखी व्हेरिएंट आढळून येऊ शकतात,' असं जेंगली म्हणाल्या.