चीनमधील एका महिला गव्हर्नरला चुकीच्या वर्तनासाठी 13 वर्षांची शिक्षा आणि एक मिलियन युआन (जवळपास 1.18 कोटी रुपये) एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. या महिला गव्हर्नरचे नाव झोंग यांग असे असून तिच्यावर 58 पुरुष कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि जवळपास 60 मिलियन युआनची लाच घेतल्याचा आरोप आहे.
कम्युनिस्ट पक्षासाठी केलं आहे काम - साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, गव्हर्नर (China governor News) झोंग यांगला 'सुंदर गव्हर्नर' म्हणूनही संबोधले जाते. तीने गुइझोउ प्रांतात कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (CPC) गव्हर्नर आणि उप सचिव म्हणूनही काम केले आहे.
58 पुरुषांशी ठेवले शारीरिक संबंध -संबंधित 52 वर्षीय महिला गव्हर्नरवर 58 पुरुष कर्मचाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. काही लोक तिच्याकडून लाभ मिळवण्यासाठी तिचे प्रियकर झाले. तर काहीनी इच्छा नसतानाही कामावरून काढून टाकण्याच्या भीतीने असे केले. झोंगने ओव्हरटाइम काम करण्याच्या आणि बिझनेस टूरच्या बहाण्याने आपल्या प्रियकरांसोबत वेळ घालवला.
डॉक्यूमेंट्रीतून लाच घेतल्याचे उघड -जानेवारी महिन्यात गुइझोउ रेडिओ आणि टेलिव्हिजनने तयार केलेल्या एका डॉक्यूमेन्ट्रीने झोंगशी संबंधित अनेक वादांवर मोठे खुलासे केले होते. यातून झोंगने अनेक वेळा लाच घेतली आणि पदाचा गैरवापर करत आपल्या पसंतीच्या कंपन्यांना सरकारी गुंतवणुकीच्या बहाण्याने आकर्षक कंत्राटं दिली.
2023 मध्ये झाली होती अटक - झोंगला एप्रिल 2023 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. यानंतर, सप्टेंबर महिन्यात तिची पदावरून आणि सीपीसीतूनही हकालपट्टी करण्यात आली होती. तिने नॅशनल पिपल्स काँग्रेसमधील आपले पदही गमावले. महत्वाचे म्हणजे, झोंग शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.