बीजिंग: कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चीन खरी संख्या दडपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. धक्कादायक म्हणजे, चीनमध्ये दोन आठवड्यांपासून कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची नोंदच होत नाही. परंतु चीनची ही चालाखी धगधगत्या स्मशानांनी जगापुढे आणली आहे.
बीजिंग स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कमीतकमी ३० कोविड पीडितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीजिंगमधील स्मशानांत २४ तास अंत्यसंस्कार सुरू असून, कोविड मृत्यूंना प्राधान्य दिले जात आहे, असेही कर्मचाऱ्याने सांगितले. पत्रकारांनी कोरोना बाधित रुग्णांच्या शरीरावर रुग्णालयात विशिष्ट पिशव्या देखील पाहिल्याने चीनची पोलखोल झाली आहे. बीजिंगसाठी अंतिम अधिकृत कोविड मृत्यूची नोंद २ नोव्हेंबर रोजी झाली होती.
ब्रिटन : कोरोनाची आकडेवारी बंद
नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी प्रकाशित करणे थांबविण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला आहे. लोकांनी आता ‘कोरोनाबरोबर सहजीवन’ शिकून घेतले आहे, त्यामुळे दररोज आकडेवारी जाहीर करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
वृद्ध म्हणतात... आम्हाला लस नको
चीनला उशिरा का होईना जाग आली असून, वृद्धांना लस देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु लोक लसीच्या दुष्परिणामांमुळे ती घ्यायला टाळत आहेत. यासंदर्भात, ६४ वर्षीय ली लियानशेंग म्हणतात की, ताप, रक्ताच्या गाठी आणि इतर दुष्परिणामांमुळे त्यांचे मित्र कोविडविरोधी लस घेऊ इच्छित नाहीत.
पाकची तयारी नाही
- चीनसह काही देशांमध्ये वेगाने पसरत असलेल्या नवीन कोरोना विषाणू प्रकाराचे देशात आगमन रोखण्यासाठी पाकचे आरोग्य अधिकारी तयार नसल्याचे दिसून येते, असे वृत्त पाकमधील ’डॉन’ या वृत्तपत्राने दिले.
- नॅशनल कमांड ॲण्ड ऑपरेशन सेंटरचे म्हणणे आहे की, परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. परंतु कोविडची नवी प्रकरणे शोधण्यासाठी विमानतळांवर जलद चाचणीचे कोणतेही उपाय केलेले नाहीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"