बेल्ट अँड रोड हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा ड्रीम प्रोजेक्ट आता त्यांच्यासाठीच डोकेदुखीचं कारण ठरत आहे. जगावर राज्य करण्यासाठी चीननं बेल्ट अँड रोड प्रकल्प पुढे नेला आणि तब्बल १ ट्रिलियन डॉलर्स खर्च करण्यास सुरुवात केली. आता हा प्रकल्प चीनसाठी अडचणीचा ठरला आहे. गेल्या ३ वर्षांत, चीननं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये ७८ अब्ज डॉलर्स गमावले आहेत किंवा त्याबाबत पुन्हा चर्चेच्या फेऱ्या सुरू कराव्या लागल्या आहेत. चीनला त्यांचा मित्र म्हणवणाऱ्या पाकिस्तानसह अनेक देशांच्या कर्जाची पुनर्रचना करावी लागल्याची माहितीही समोर आलीये.
फायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार चीनचा १ ट्रिलियन डॉलर्सचा बेल्ट अँड रोड प्रकल्प आता बुडीत कर्जाचा बळी ठरला आहे. यामुळे, गेल्या ३ वर्षांत ७८ अब्ज डॉलर्सचं कर्ज एकतर माफ केलं गेलं आहे किंवा त्याची पुनर्रचना करावी लागली आहे. बीआरआय प्रकल्पामुळे चीन जगातील सर्वात मोठा कर्जदार देणारा बनलाय. चीननं ७८.५ टक्के कर्ज रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी दिलं होतं.
बीआरआयवर मोठा खर्चन्यूयॉर्क स्थित संशोधन संस्था रोडियम ग्रुपनं आपल्या डेटाच्या आधारे ही नवी माहिती दिली आहे. रोडियमनं सांगितलं की, २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत, १७ अब्ज डॉलर्सचं कर्ज एकतर माफ झालं किंवा त्याची पुनर्रचना केली गेली. गेल्या दशकात बीआरआय अंतर्गत किती कर्ज दिलं गेलं याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. तरी यावर चीननं जगभरात १ ट्रिलियन डॉलर्स खर्च केले असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय चीननं कर्ज घेणाऱ्या १५० देशांना वाचवण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत अशी बेलआउट पॅकेजेस १०४ अब्ज डॉलर्स इतकी होती. एवढंच नाही तर २००० ते २०२१ पर्यंतचे आकडे पाहिले तर ही एकूण रक्कम २४० अब्ज डॉलरवर पोहोचते.