शांघाई:चीनच्या चांगशा शहरात एका सरकारी कंपनीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चीनच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. बहुमजली इमारतीतील अनेक मजल्यांमध्ये ही भीषण आग लागली असून, यात मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडिओत इमारतीतून आगीचे लोट निघत असल्याचे दिसत आहे. ही घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीमध्ये किती लोक होते? या घटनेत किती नुकसान झाले? जीवितहानी झाली का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळू शकली नाहीत. सध्या मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये अनेकांची घरे आणि कार्यालये आहेत. चीनमधील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमची ही इमारत आहे. शहराच्या मध्यभागी इमारत असल्यामुळे संपूर्ण शहरातून ही आग दिसत आहे. स्थानिक माध्यमांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये धुरामुळे इमारत बाहेरून पूर्णपणे काळी पडल्याचे दिसत आहे. चांगशा ही हुनान प्रांताची राजधानी आहे, जिथे सुमारे 10 मिलीयन लोक राहतात.