चीनच्या कुरापती काही केल्या थांबत नाहीयेत. पूर्व लडाखनंतर त्यांची नजर आता पाकव्याप्त काश्मीरवर म्हणजेच PoK वर आहे. सॅटेलाइट चित्रात याबाबत एक खळबळजनक बाब दिसून आली आहे असा दावा केला जात आहे. चीनने ताजिकिस्तानमध्ये १३ हजार फूट उंचीवर लष्करी तळ बांधला असल्याचे नुकतेच सांगण्यात आले होते. हे काम अनेक दशकांपासून सुरू अशी माहिती आता मिळत असून हे ठिकाण PoK पासून फार दूर नाही. तेथे गुप्त लष्करी तळ उभारून दारूगोळा जमा करणे हा चीनच्या या कारवाईमागील उद्देश आहे, असे म्हटले जात आहे.
मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सॅटेलाइटमधून घेतलेली काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांवरून चीन गुप्त लष्करी तळ उभारत असल्याचा दावा करण्यात आला आहे. लष्करी तळाच्या भिंती आणि प्रवेशाचे रस्ते, वॉच टॉवर हेलिपॅड चित्रांमध्ये दिसत आहेत. या लष्करी तळाच्या माध्यमातून चीन मध्य आशियात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लष्करी तळाला 'काऊंटर टेरर बेस' असे नाव
ताजिकिस्तानमध्ये उभारण्यात येत असलेल्या लष्करी तळाला 'काउंटर टेरर बेस' असे नाव देण्यात आले आहे. चीनची ही कृती भारतासाठी चिंतेचे कारण आहे. यामुळे चीनचा गुप्त लष्करी तळ पीओके आणि भारताच्या अगदी जवळ येईल. चीन ज्या ठिकाणी आपला लष्करी तळ बनवत आहे ती जागा अफगाणिस्तान सीमेजवळ असल्यामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हे सुमारे ४,००० मीटर उंचीवर डोंगरावर बांधले गेले आहे.
चीनकडून वृत्ताचा इन्कार
चीनने मात्र हे वृत्त निराधार म्हणत फेटाळून लावले आहे. पण फोटो मात्र खरी असल्याचे म्हटले जात आहे. ताजिकिस्तानमध्ये कोणताही गुप्त लष्करी तळ बांधला जात नसल्यचे चीन म्हणत आहे. चिनी दूतावासाने हा अहवाल खोटा ठरवला असून हा मुद्दा चीन-ताजिकिस्तान चर्चेच्या अजेंड्यावर नसल्याचे म्हटले आहे.