चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चीनमध्ये एका वृद्ध व्यक्तीला चुकून मृत घोषित करण्यात आले आणि नंतर त्याला शवागारात पाठवण्यात आले. यानंतर शवागारात ती वृद्ध व्यक्ती जिवंत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शांघाईमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. वृद्धाला मृत घोषित केल्यानंतर लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या शहरात निषेधाची नवी लाट सुरू झाली आहे.
चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन पुरुष, जे शवागारातील कामगार म्हणून दिसत आहेत, ते शांघाई वेल्फेअर हॉस्पिटलच्या बाहेर पिवळ्या रंगाची बॅग आणतात. प्रोटेक्टिव्ह कपडे घातलेले हे लोक शवागारातील कर्मचार्यांसमोर बॅगची चेन उघडताना दिसतात, ज्यामध्ये एक माणूस जिवंत असलेला दिसतो. हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने सोमवारी ही बातमी प्रसिद्ध केली. त्यानंतर स्टाफ मेंबरला जिवंत असल्याचे काही संकेत दिसतात आणि मग त्याचा जीव गुदमरेल असे सांगून रुग्णाला पिशवीतून बाहेर काढले.
व्हिडिओनुसार, कर्मचारी सदस्य पीपीई किट घातलेला दिसतो आणि हे लोक वृद्धाला पुन्हा वृद्धाश्रमात घेऊन जातात. या घटनेमुळे अनेक दिवसांपासून संपूर्ण शहरात कडक लॉकडाऊन विरोधात संतप्त झालेल्या शांघाईच्या लोकांमध्ये भीतीची नवी लाट पसरली आहे. 28 मार्चनंतर या शहरातील लॉकडाऊनमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. 26 मिलियन लोकसंख्येच्या शहरात ओमायक्रॉन उद्रेकानंतर शांघाईच्या स्थानिक सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्हीनुसार, पुटूओच्या सिविल अफेयर्स ब्युरोने दावा केला आहे की, तपासानंतर दोषींना शिक्षा केली जाईल. बॅगमध्ये आणलेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे केअर सेंटर 1983 मध्ये स्थापन करण्यात आले जेथे 100 हून अधिक वृद्ध लोक राहतात. सेंटरच्या वतीने माफी मागितली आहे. याच दरम्यान, शांघाईमध्ये कोरोनाची 7333 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. रविवारी, शांघाईमध्येही 32 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 431 वर पोहोचली आहे.