कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाली. दोन वर्षांपासून जग जेव्हा मरणयातना भोगत होते, तेव्हा चीनमध्ये खुलेआम व्यवहार सुरु झाले होते. चीनने कोरोना पूर्णपणे आटोक्यात आणला होता. परंतू जेव्हा जग कोरोनातून मुक्ततेकडे जाऊ लागले तेव्हा पुन्हा चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. जगाने ज्या ओमायक्रॉनला फ्लॉवर समजले त्याने चीनमध्ये जोरदार फायर केले आहे.
चीनमध्ये गेल्या दोन वर्षांत जेवढे रुग्ण सापडले नाहीत तेवढे दर दिवशी सापडू लागले आहेत. यामुळे नऊ कोटींहून अधिक लोकांना लॉकडाऊनमध्ये रहावे लागत आहे. चीनचे दोन तृतियांश प्रांत कोरोनाच्या रहस्यमयी ओमायक्रॉनच्या विळख्यात आले आहेत. परिस्थिती एवढी चिघळली आहे की, वुहान महामारीनंतरचे दुसरे सर्वात मोठे संक्रमण म्हटले जाऊ लागले आहे. चीनमध्ये अशीच परिस्थिती राहिली तर संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात जाईल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेने सांगितले की, देशात कोरोनामुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी २०२१ पहिल्यांदाच मृतांची संख्या वाढली आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले आहेत. दोन्ही मृत्यू हे जिलिंन प्रांतात झाले आहेत. यामुळे एकूण मृतांचा आकडा 4,638 झाला आहे. चीनमध्ये शनिवारी कोरोनाचे 2,157 नवे रुग्णसापडले.
जगभरातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 46.76 कोटींवर पोहोचली आहेत. या महामारीमुळे आतापर्यंत 60.7 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 10.77 अब्जांहून अधिक लसीकरण करण्यात आले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी शेअर केली आहे. CSSE नुसार, यूएस हा जगातील सर्वाधिक 79,717,219 रुग्ण आणि 970,804 मृत्यूंसह प्रभावित देश आहे. भारत हा दुसरा सर्वाधिक प्रभावित देश आहे, जिथे कोरोनाचे 43,004,005 रुग्ण आढळले आहेत, तर 516,281 लोकांचा मृत्यू झाला आहे.