जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. भुकेने लोक व्याकूळ झाले असून पोट भरण्यासाठी टोकाचं पाऊल उचलत आहेत. चीनमधील शांघाईमध्ये एका व्यक्तीने जाणूनबुजून कोरोना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले. पोलिसांकडे जात तो माणूस म्हणाला की मला अटक करा. तुरुंगात जेवण मिळेल या आशेने त्याने हे केले. चीनमधून मीडिया रिपोर्ट्स, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा भयंकर घटना आता समोर येत आहेत. चीनमधील 'झिरो कोविड पॉलिसी'मुळे परिस्थिती बिकट झाल्याचं म्हटलं जात आहे.
चीनचे सर्वात मोठे शहर शांघाई कोरोनाच्या सर्वात वाईट प्रकोपाचा सामना करत आहे, साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून, चीनला संसर्गाच्या सर्वात प्राणघातक लाटेचा सामना करावा लागत आहे. कडक निर्बंधामुळे लोकांकडील खाण्यापिण्याच्या गोष्टी संपत आहे, त्यामुळे घरात कैद असलेल्या करोडो लोकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. वेगवेगळ्या अहवालांनुसार, स्थानिक लोकांना वैद्यकीय पुरवठ्यासह मूलभूत गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. शांघाईमध्ये बाजार बंद असल्याने महागाईही गगनाला भिडत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये असा दावा केला जात आहे की शांघाईमधील लोक घराबाहेर पडून निषेध करत आहेत.
लोक त्यांच्या खिडक्या आणि बाल्कनीत येऊन ओरडत आहेत आणि आपला राग व्यक्त करत आहेत. 'मदत, मदत, मदत, आमच्याकडे खायला काही नाही' असं दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लोक ओरडत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनमधील शांघाईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाद्यपदार्थांच्या वितरणात अनेक अडचणी येत आहेत. अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मेगा सिटीतील लोक खाण्यापिण्यासाठी तडफडत आहेत. शहरातील नागरिकांना दिवसातून फक्त एकदाच अन्न मिळत आहे.
स्थानिक लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते. ते किती दिवस जिवंत आहेत, हे त्यांनाच माहीत नाही. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सरकारने शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन लागू केले. शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी सरकारने हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यासाठी लष्कराच्या डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जात आहे. असे असूनही शांघाईमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येऊ शकला नाही. लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यास भाग पाडले गेले आहे. झिरो कोविड धोरणांतर्गत येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे लोक आता त्रस्त झाले आहेत. येथे लोकांकडे अन्नपदार्थ देखील शिल्लक राहिलेले नाहीत. एका वयोवृद्ध महिलेने अन्नासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील सांगितलं आहे. लोकांनी दावा केला आहे की खाण्या-पिण्याचं सामान संपत आहे. तसेच सुपरमार्केट आणि दुकानातील स्टॉक देखील कमी होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.