Coronavirus China : चीनमधील (China) शांघायमध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या पार्श्वभूमीवर चिनी प्रशासनाने येथे कडक लॉकडाऊन लागू केले आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार शांघायमध्ये लोकांवर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. लोकांचे खाण्यापिण्याचे पदार्थ संपले आहेत. तर दुसरीकडे शहरात एका व्यक्तीने कोविड लॉकडाऊनचे नियम तोडले आणि तो पोलिसांपर्यंत पोहोचला. तुरुंगात किमान अन्न तरी मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती.
शांघायची लोकसंख्या सुमारे २६ दशलक्ष आहे. शांघायमध्ये अतिशय कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. चीनचे आर्थिक केंद्र म्हटल्या जाणाऱ्या या शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटकाही बसतोय. २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासूनचा हा कोरोनाचा चीनला बसलेला हा सर्वात जास्त फटका आहे.औषधांचीही कमतरतादीर्घ काळासाठी घरांमध्ये बंदिस्त असल्यानं लोकांचे मानसिक हालही झाले आहेत. दैनंदिन गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. लोकांजवळ जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा सातत्याने वाढत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. औषधांचाही तुटवडा होत आहे. महागाईनेही जनता हैराण झाली आहे. शहरात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.घरांच्या खिडक्यांमधून लोकांचा आवाजसोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक मदतीची याचना करताना दिसत आहेत. लोक त्यांच्या घराच्या खिडक्यांमधून मदतीसाठी ओरडत आहेत. दरम्यान, या ठिकाणची परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. अनेक जण आता आपल्या घरांमधून बाहेर पडून विरोध करत आहेत. आम्ही उपासमारीनं मरत आहोत, असं आंदोलक सांगत आहेत. आम्हाला मदत हवी आहे. सरकार आमचा आवाज ऐकत नाही, असंही ते म्हणताना दिसतायत.