बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे आणखी ५७ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर बळींची संख्या ३६१ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत १७,२०५ लोकांना याचा संसर्ग झाला आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सोमवारी दैनिक अहवालात म्हटले आहे की, २ फेब्रुवारी रोजी कोरोनाचे २८२९ नवे प्रकरणे समोर आले आहेत. संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या आता १७,२०५ झाली आहे. ज्या ५७ लोकांचा मृत्यू झाला आहे त्यातील ५६ हुबई प्रांतातील आहेत, तर एक व्यक्ती चोंगकिंगमधील आहे.
कोरोनाचे सर्वाधिक बळी हुबेई प्रांतात झाले आहेत. रविवारी आणखी ५१७३ संशयित रुग्ण समोर आले आहेत. रविवारी १८६ जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. १४७ लोकांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे. सध्या २२९६ लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे, असे सांगितले जात आहे की, कोरोना विषाणू हा विषाणूंचा एक मोठा समूह आहे; पण यातील केवळ सहा विषाणू लोकांना संसर्ग करतात. याच्या प्रभावाने सर्दी होते.
‘सार्स’मुळे २००२-०३ मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये जवळपास ६५० लोकांचा मृत्यू झाला होता.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनसोबतची सीमा बंद करण्याची मागणी करत हाँगकाँगच्या शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. हाँगकाँगमध्ये या विषाणूच्या संसर्गाचे १५ प्रकरणे समोर आले आहेत. यातील बहुतांश लोक चीनहून आलेले आहेत.
१० दिवसांत हॉस्पिटल
कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी चीनने केवळ १० दिवसांत हॉस्पिटल उभारले असून, सोमवारी या ठिकाणी रुग्णांची भरती सुरूझाली आहे.चीनच्या वुहान शहरातून या विषाणूंचा प्रसार सुरूझाला होता. १५०० बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यात आले. वुहानसाठी १४०० डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.या शहराची लोकसंख्या १ कोटी १० लाख आहे. संक्रमणाच्या भीतीमुळे लोकांना कुठेही ये-जा करण्यासाठी निर्बंध आहेत. यापूर्वी २००३ मध्ये सार्सचा संसर्ग झाला होता. त्यासाठी एका आठवड्यात उपचार केंद्र उभे केले होते.