चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. या महिन्यात चीनमध्ये कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमधील रुग्णालयांशिवाय, स्मशाभूमीतही गर्दी दिसत आहे. चीनने याच महिन्याच्या सुरुवातीला झिरो कोविड पॉलिसी शिथिल केली होती. आता येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यातच, चीनने कोरोना बाधितांची संख्या लपवण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत.
आता चीन कोरोना संक्रमितांचे आकडे जारी करणार नाही -आपण रविवारपासून (25 डिसेंबर) कोरोना व्हायरसचा डेटा जारी करणार नाही, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (China National Health Commission) म्हटले आहे. यापूर्वी, गेल्या तीन वर्षांपासून चीन कोरोनाचे दैनंदीन आकडे जाहीर करत होता. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) अपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोरोनसंदर्भातील माहिती चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनद्वारे (Chinese Center for Disease Control and Prevention) प्रकाशित केले जातील.
20 दिवसांत 25 कोटी कोल संक्रमित झाल्याचा दावा- यातच एका लीक झालेल्या दस्तएवजांमध्ये, चीनमध्ये 1 डिसेंबर ते 20 डिसेंबर या काळात जवळपास 25 कोटी लोक संक्रमित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हाँगकाँगच्या 'साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या 20 मिनिटांच्या बैठकीत लीक झालेल्या या दस्तएवजानुसार, 1 ते 20 डिसेंबरदरम्यान 24.8 कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. चीनच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता हा आकडा 17.65 टक्के एवढा आहे.
एका दिवसात 3.7 कोटी नवे रुग्ण -चीनमध्ये सध्या रुग्ण वाढीसाेबत मृत्यूचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. परिस्थिती एवढी भीषण झाली आहे की, मृदतेह ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. चिता शांत हाेण्यापूर्वीच अनेक मृतदेह आणले जात आहेत. एवढेच नाही तर अस्थी मिळविण्यासाठी नातेवाइकांना टाेकन घ्यावे लागत आहेत. ब्लूमबर्गने चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनच्या हवाल्याने सांगितले की, मंगळवारी देशात एका दिवसात ३ कोटी ७० लाख नवे काेराेनाबाधित आढळले आहेत. या महिन्यात २० दिवसांत २४ कोटी ८० लाख लोकांना संसर्ग झाला. जानेवारीत एका दिवसात ४० लाख लोकांना संसर्ग झाला होता.