वुहान : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संक्रमणाने सध्या हाहाकार माजला आहे. या विषाणूचा फैलाव चीनबाहेर अन्य देशांमध्येही झाला आहे. या विषाणुमुळे अनेक लोकांचा बळी जात आहे. या जीवघेण्या कोरोना विषाणूबाबत सर्वात आधी धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ली वेनलियांग असे या डॉक्टरचे नाव आहे. ली वेनलियांग यांना सुद्धा कोरोना विषाणूची लागण झाली होती. गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
चीनमधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या माहितीनुसार, ३४ वर्षीय ली वेनलियांग यांच्या मृत्यू कोरोना विषाणुमुळे झाला. ज्यावेळी वुहान शहरात कोरोना विषाणूची माहिती लपवण्याचा प्रयत्न करण्यात येते होता. त्यावेळी ली वेनलियांग यांनी रुग्लालयातून व्हिडीओ पोस्ट करत कोरोना विषाणूबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. याप्रकरणी चीनच्या स्थानिक आरोग्य विभागाने ली वेनलियांग यांची चौकशी केली होती. एवढेच नाही तर वुहान पोलिसांनी ली वेनलियांग यांना नोटीस जारी केली होती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा आरोप केला होता.
कोरोनाची लागण झाल्यामुळे 12 जानेवारीला ली वेनलियांग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका रुग्णामार्फत कोरोना विषाणूची लागण त्यांनी झाली होती. तर, गेल्यावर्षी 30 डिसेंबरला ली वेनलियांग यांनी एका चॅटिंग ग्रुपमध्ये आपल्या सहकारी डॉक्टरांना मेसेज पाठविला होता आणि कोरोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा दिला होता. याशिवाय, या विषाणूपासून वाचण्यासाठी सहकारी डॉक्टरांना खास कपडे परिधान करण्याचा सल्लाही ली वेनलियांग यांनी दिला होता.
दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणुमुळे झालेल्या मृतांचा आकडा हजारोंमध्ये असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनमधली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या टेनसेंटने कोरोना विषाणूमुळे 24 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली. मात्र काही वेळातच टेनसेंटने ही आकडेवारी संकेतस्थळावरुन हटविली. त्यामुळे मृतांचा आकडा निश्चित किती आहे, हे अद्याप समजू शकत नाही. कारण, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 663 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीन सरकारने दिली आहे. तर 30 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे म्हटले आहे.
(कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक)
(कोरोनाची साथ रोखण्यात रोबो, ड्रोनसह तंत्रज्ञानाचा वापर)
(हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका; 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता)