जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही महिन्यांमध्ये चीनने कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता चीनने बुधवारी झांगजियाजेई शहर सील केलं आहे. तसेच शहरातील स्थानिक नेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार आता 17 प्रांतात झाला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. चीनची एक चूक यासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी चीनकडून खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. दररोज हजारो लोकांची कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतरही कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाला. चीनमध्ये नव्याने पसरलेल्या संसर्गामागे मॉस्कोमधून आलेले प्रवाशी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. जुलै महिन्यातील मध्यात चीनमधील नानजिंग शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मॉस्कोहून एक प्रवासी विमान आले होते. त्यातील सात जणांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली होती.
सात कोरोनाग्रस्तांकडून विमानतळावरील सफाई कर्मचाऱ्यांना देखील लागण झाली होती. 20 जुलैपर्यंत 9 जणांना कोरोनाची लागण झाली. या बाधित कर्मचाऱ्यांकडून इतरांना संसर्ग झाला. काही दिवसांमध्ये डेल्टा व्हेरिएंट नानजिंगपासून 1900 किमी दूर असलेल्या हैनानमध्ये दाखल झाला. विमानतळावरून सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग इतर प्रांतात देखील झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा सध्या संपूर्ण जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या व्हेरिएंटची प्रत्यक्ष संसर्ग क्षमता जाणून घेण्यासाठी सतत रिसर्च सुरू आहे. याच दरम्यान चीनमध्ये (China) केलेल्या एका रिसर्चमध्ये नवी माहिती समोर आली आहे.
रिसर्चनुसार, सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीने अधिक व्हायरस असतात. तसेच कोरोनाचा मूळ वुहान व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट खूपच संसर्गजन्य आणि धोकादायक आहे असं देखील म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकते, असं एका संशोधकाचे म्हणणं आहे. म्हणूनच हा व्हेरिएंट अधिक लोकांना संक्रमित करतो. तसेच हा अत्यंत वेगाने देखील पसरत आहे. चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना बाधितांवर संशोधन केलं आहे. सद्यस्थितीत चीनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आणि टेस्टिंग-ट्रेसिंगचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गजन्य संभाव्यतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.