नवी दिल्ली : चीनने भारतासोबतच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) ६० हजार सैनिक तैनात केले असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेव यांनी म्हटले आहे. या लढाईत भारतासाठी अमेरिकेने मित्र व भागीदार होण्याची नितांत गरज आहे, असेही पॉम्पेव यांनी म्हटले आहे.
‘क्वॉड’चे सदस्य असलेल्या अमेरिका, भारत, आॅस्ट्रेलिया व जपान या चार देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक गुरुवारी टोकियो येथे झाली. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच ‘क्वॉड’ देशांनी थेट चर्चा केली. बैठक संपवून अमेरिकेला परतल्यानंतर पॉम्पेव यांनी तीन मुलाखती देऊन चीनच्या कारवाया उघड केल्या.
पॉम्पेव यांनी या मुलाखतींमध्ये सांगितले की, मी भारत, आॅस्ट्रेलिया व जपान या देशांच्या विदेश मंत्र्यांसोबत होतो. या सर्वांनाच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून धोका निर्माण झाला आहे. त्यांना त्यांच्या गृहदेशातही हा धोका दिसत आहे. भारताने चीनसोबत हिमालयात प्रत्यक्ष संघर्षही केला आहे. आता चीनने भारताच्या सीमेवर सैन्याची मोठी जमवा जमव सुरू केली आहे.भारताला मैत्रीची गरजवुहानच्या विषाणूबाबत तपास करण्याची मागणी केली म्हणून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने ऑस्ट्रेलियालाही धमकावले होते. चीनच्या या कारवायांविरुद्ध आम्ही भागीदार व मित्र बनण्याची गरज आहे.