नवी दिल्ली - टेक्नॉलॉजीसाठी आघाडीवर असलेल्या चीनने कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव कमी करण्यात यश मिळवले आहे. परंतु, कोरोना व्हायरसवर लस शोधण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. कोरोनावर शोधणे हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. त्यातच चीनमधील संशोधकांनी कोरोना व्हायरसला शरीरातच नष्ट करण्याचा उपाय शोधल्याचा दावा केला आहे.
कोरोना व्हायरसचा उगम चीनमधील वुहान शहरातून झाला होता. या व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांचा चीनमधील आकडा ८१ हजारच्या पुढे गेला आहे. तर ३३०० लोकांना कोरोनामुळे जीव गमावला आहे. कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे सर्वच देश या व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान चीनच्या सरकारी माध्यमांनी दावा केला की, चीनच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी शस्त्र तयार केले आहे. संशोधकांनी असं नॅनोमटेरियल बनवल की, ते शरीरात जावून कोरोना व्हायरसचा खात्मा करेल. हे नॅनोमटेरियल कोरोना व्हायरसचा ९६.५ ते ९९.९ टक्केपर्यंत खात्मा करू शकते, असा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच ही लस किंवा औषध नसून बायोव्हेपन सारखे आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी याला खास तयार करण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे.
काय असतं नॅनोमटेरियल ?
नॅनोमटेरिलय अनेक प्रकराच्या निर्मिती प्रक्रियेत वापरण्यात येते. आरोग्यक्षेत्रा व्यतिरिक्त पेंट्स, फिल्टर्स, इन्सुलेशन आणि लुब्रिकेंटच्या निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. आरोग्यक्षेत्रात याला नॅनोएन्झाईम्स देखील म्हटले जाते. शरीरात अढळून येणाऱ्या एन्झाइम्सप्रमाणेच हे काम करत असते. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनुसार नॅनोमटेरियल संदर्भात जगभरात फारशी माहिती नाही. मात्र काही विशेष कामासाठी नॅनोमटेरियल तयार करता येऊ शकते.