आक्रमक आणि विस्तारवादी भूमिका ठेवणाऱ्या चीननं आता मिसाईल ट्रेनिंग क्षेत्राचा (Missile Training Area) विस्तार करण्यास सुरुवात केलीय. सॅटलाइट छायाचित्रांमधून याची पुष्टी देखील करण्यात आली आहे. चीनकडून स्टोरेज कंटनेर्स (Storage Containers), सुरुंग आणि त्यासाठी लागणाऱ्या संसाधनांचा विस्तार केला जात अशल्याचं छायाचित्रांमध्ये दिसून येतं. चीन येत्या काळात लष्करी ताफ्यात अतिशक्तीशाली मिसाईल दाखल करुन घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
चीनची ही आक्रमक भूमिका अमेरिकेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कारण अमेरिकन शस्त्रांपेक्षाही कितीतरी पटीनं अधिक शक्तीशाली शस्त्रास्त्र निर्मितीचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टमध्ये न्यूक्लिअर इन्फॉरमेशन प्रोजेक्टचे संचालक हेंस एम क्रिस्टेंस हे संरक्षण क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, चीनकडून कमीत कमी १६ स्टोरेज कंटनर्सची निर्मिती केली जात आहे.
पीएलए रॉकेट फोर्सचे ट्रेनिंग क्षेत्रमिसाईल लोडिंग ऑपरेशनचा कुणालाही थांगपत्ता लागू न देण्यासाठी चीनकडून सुरुंग उभारले जात आहेत. समोर आलेल्या छायाचित्रानुसार मंगोलिया प्रांताच्या जिलंताई शहराच्या पूर्वेकडे मिसाईल ट्रेनिंग क्षेत्र दिसत आहे. याच परिसरात पीएलए रॉकेट फोर्सच्या मिसाइल टीमला प्रशिक्षण दिलं जातं. हा परिसर जवळपास २०९० वर्ग किमी इतका पसरलेला आहे. यात वाळवंटी आणि डोंगराळ भागाचाही समावेश आहे. चीनच्या या ट्रेनिंग क्षेत्राची लांबी जवळपास १४० किमी इतकी आहे.
चीननं याच जागेत २०१३ नंतर आतापर्यंत १४० लॉंचिंग पॅड्स तयार केले आहेत. याचा उपयोग ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. याच ठिकाणी काही कॅम्प देखील तयार करण्यात आले आहेत. यासोबतच संपूर्ण परिसरात गॅरेज सर्व्हिसिंग लॉन्चर आणि सपोर्टिंग वाहनं गस्त घालत असतात. सध्या याच जागेवर स्टोरेज कंटनेर्सची निर्मिती केली जात आहे. मिसाईलला सुरक्षित आणि लपविण्यासाठी येथे सुरुंगही तयार केले जात आहेत.